शिवजयंती दिवशी “नूर-ए-रमजान” फूड अँड ट्रेड एक्स्पोचा भव्य शुभारंभ; ३० दिवस चालणार खाद्य-व्यापार महोत्सव

  शिवजयंती दिवशी “नूर-ए-रमजान” फूड अँड ट्रेड एक्स्पोचा भव्य शुभारंभ; ३० दिवस चालणार खाद्य-व्यापार महोत्सव



कोल्हापूर १९  सिटी न्यूज नेटवर्क 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी मुस्लिम प्रोग्रेसिव्ह महासंघ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे यांच्या संयुक्त विद्यमाने “नूर-ए-रमजान फूड अँड ट्रेड एक्स्पो”चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पवित्र रमजान महिन्यात आयोजित हा भव्य एक्स्पो तब्बल ३० दिवस नागरिकांसाठी खुला राहणार आहे.


रमजान हा संयम, श्रद्धा आणि बंधुभावाचा महिना मानला जातो. या पार्श्वभूमीवर आयोजित एक्स्पोमध्ये पारंपरिक व रमजान विशेष खाद्यपदार्थ, इफ्तारसाठी खास डिशेस, कपडे, हस्तकला वस्तू तसेच विविध व्यावसायिक स्टॉल्सची रेलचेल पाहायला मिळत आहे. स्थानिक उद्योजक व व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी हे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.


शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक फिरोज सौदागर, फारुख मुल्ला, फारुख हुदली, अजीज मिरजकर, रोहित जगदाळे, आलू बखर मोमीन, शिरीन इमाम जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शिवजयंती आणि रमजान या दोन महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या संगमातून सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देणारा हा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.


आयोजकांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ३० दिवस चालणाऱ्या “नूर-ए-रमजान” फूड अँड ट्रेड एक्स्पोचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


रमजानच्या पावन वातावरणात आणि शिवजयंतीच्या प्रेरणादायी पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा एक्स्पो कोल्हापूरकरांसाठी खाद्य, खरेदी आणि सामाजिक एकात्मतेची पर्वणी ठरत आहे.

Comments