शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! ‘गोकुळ’कडून दूध खरेदी दरात वाढ; महिन्याला साडे सात कोटींचा अतिरिक्त लाभ
कोल्हापूर, ता. २० सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) (गोकुळ) संघाने दूध उत्पादकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे संलग्न दूध उत्पादकांना दरमहा सुमारे सात ते साडे सात कोटी रुपयांचा अतिरिक्त मोबदला मिळणार आहे.
संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले की, दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
📈 नवीन दर काय?
दि. २१ फेब्रुवारी २०२६ पासून पुढीलप्रमाणे दर लागू होणार आहेत:
म्हैस दूध (६.० फॅट, ९.० एसएनएफ):
₹५२.५० वरून ₹५३.५० प्रति लिटरगाय दूध (३.५ फॅट, ८.५ एसएनएफ):
₹३४.०० वरून ₹३६.०० प्रति लिटर
हा निर्णय दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सद्य बाजारस्थितीचा विचार करून घेण्यात आला.
🏭 ७,५०० संस्था आणि १७ लाख लिटर संकलन
गोकुळ संघाशी संलग्न सुमारे ७,५०० प्राथमिक दूध संस्थांमार्फत दररोज जवळपास १७ लाख लिटर दूध संकलन केले जाते. संघाच्या मते, दूध उत्पादक हेच गोकुळचे केंद्रबिंदू असून त्यांच्या प्रगतीसाठी संघ सदैव कटिबद्ध आहे.
मुश्रीफ यांनी सांगितले की, “दूध उत्पादक, संस्था, सचिव आणि कर्मचारी — प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.”
दरवाढीबाबतचे सुधारित दरपत्रक लवकरच प्राथमिक दूध संस्थांना पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Post a Comment