पंचगंगा आरती भक्त मंडळातर्फे पंचगंगा नदी प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन

पंचगंगा आरती भक्त मंडळातर्फे पंचगंगा नदी प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन



कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क 

 पंचगंगा आरती भक्त मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने पंचगंगा नदीचा प्रकटदिन सोहळा पारंपरिक व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ शुद्ध दशमी, सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.



परंपरेनुसार करवीरनिवासिनी पंचगंगा नदीचे पूजन, होमहवन तसेच पारंपरिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री करवीरमाहात्म्य या प्राचीन ग्रंथातील वर्णनाप्रमाणे सूर्यास्तानंतर पंचगंगेच्या तीरावर होमहवन करून नदीचे पूजन केले जाते.

यावेळी कुंभार बांधवांकडून नदीतील जलचरांना खाद्य म्हणून तांदळाच्या पिठाचे जलचर बनवून नदीत सोडण्याची परंपरा देखील पार पडणार आहे. होमाची समाप्ती झाल्यानंतर नदीची सौभाग्यवाणे व साडीचोळीने ओटी भरली जाणार असून शेवटी पंचगंगेची पारंपरिक आरती होणार आहे.

या उपक्रमाला करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद लाभले असून कोल्हापुरातील पुरोहित संघाचे पुरोहितही सहभागी होणार आहेत. यंदा अधिक ज्येष्ठ महिना असल्याने या कार्यक्रमाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे.

दुपारी ४ वाजता होमहवन तर सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचगंगा आरती भक्त मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments