महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे राज्यस्तरीय महाअधिवेशन १४ जून रोजी कोल्हापुरात
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे राज्यस्तरीय महाअधिवेशन १४ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज्यातील शासकीय ठेकेदारांच्या विविध समस्या, शासनाची धोरणे, विकासकामांमधील संधी तसेच फेडरेशनच्या भावी वाटचालीबाबत सखोल चर्चा होणार असल्याची माहिती निवास उर्फ बापू लाड, किशोर जमादार , विजयसिंह सावंत , प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या महाअधिवेशनात संघटन बांधणी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा व जलसंधारण विभाग, नगरविकास विभाग यांच्याशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध विभागांतील प्रलंबित प्रश्न आणि संघटनेच्या पुढील आंदोलनाची दिशा यावरही चर्चा होणार आहे.
अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजू बी. कृष्णाणी, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे महासचिव एस. ए. हकीम, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मेत्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनात ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांचा प्रश्न, ई-टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता, अनुभव व आर्थिक निकषांमधील सुधारणा, कामांच्या दराबाबत न्याय्य धोरण, जीएसटी परताव्याचा लाभ, तसेच किमान दराच्या कामांसाठी होणारी अवास्तव कपात थांबविणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन होणार आहे. ठेकेदारांना सन्मान आणि न्याय मिळावा यासाठी पुढील आंदोलनाची दिशा देखील निश्चित केली जाणार आहे.
या महाअधिवेशनाच्या आयोजनात कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ, कोल्हापूर जिल्हा शासकीय मटेरियल पुरवठा संघटना, सार्वजनिक बांधकाम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, कोल्हापूर-सांगली हॉट मिक्स प्लांट असोसिएशन तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना आदी संघटनांचा सहभाग राहणार आहे.

Comments
Post a Comment