विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यास शिवभक्त ते काढतील ! - छत्रपती संभाजीराजे यांची चेतावणी

 विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यास शिवभक्त ते काढतील :  छत्रपती संभाजीराजे यांची चेतावणी 




कोल्हापूर ५ सिटी न्यूज नेटवर्क

 रायगडावरती कुणालाही रात्री निवास करण्यास अनुमती नाही. तेथील एक दगड जरी दुसरीकडे न्यायचा असेल तरी ते कठीण असते. याउलट विशाळगडावर ‘गेस्टहाऊस’, ‘आऊटहाऊस’ झालेत, एका खोलीत चार-चार जण रहातात. इथे मद्यपान केले जाते, गांजा ओढला जातो, हुक्का ओढला जातो, इथे अनेक अवैध धंदे चालू आहेत. यामुळे शिवभक्तांमध्ये असव्यस्था निर्माण होत आहे. गडावरील वर्ष २००२, २००५, २००९ आणि वर्ष २०२२ मधील छायाचित्रे पहा आणि अतिक्रमण कसे वाढले ते दिसेल. त्यामुळे यापुढील काळात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यास शिवभक्त ते काढतील आणि त्यांच्यासमवेत मी असेन, अशी चेतावणी छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडाची पहाणी केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. 



या प्रसंगी छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे प्रशासनाने सातारा येथील प्रतापगड येथील अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवले, तसेच धाडस विशाळगड येथेही दाखवणे अपेक्षित आहे. हे अतिक्रमण काढणे हे जिल्हाधिकारी यांचेही दायित्व आहे. विशाळगडावर इतकी भयानक परिस्थिती निर्माण होण्यास कोण कारणीभूत आहे ? यासाठी आयोजित बैठकीला केवळ जिल्हाधिकारी यांनी वेळ देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा आराखडा दिला पाहिजे. आवश्यकता भासल्यास मुंबईत बैठक घ्या; मात्र आता यावर ठोस कृती अपेक्षित आहे.’’


या प्रसंगी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना निवेदन देण्यात आले. कृती समितीच्या आंदोलनामुळे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे पुरातत्व विभागाने गडावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या; मात्र या नोटिसांवर पुढे कोणतीच कृती झालेली नाही. या संदर्भात पुरातत्व विभागाचीही भूमिका ‘नरो वा कुंजरोवा’, अशी असून केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याच्या पलिकडे काहीच कृती होत नाहीये. तरी हे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात आता ठोस कृती होण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ‘जिल्हाधिकार्‍यांसमवेत होणार्‍या बैठकीत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने ही सूत्रे मांडावीत’, असे सांगितले. 

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज(बाबा) काटकर, मनसेचे सर्वश्री शिवाजी फिरके, दीपक चांदणे, विजय तटकरे, आदित्य पाटील, गजापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नारायण वेल्हाळ, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

Comments