गतविजेत्या नागपूरच्या महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखची आघाडी मजबूत...दिव्याची विजेतेपदाकडे वाटचाल
MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धाकोल्हापूर ०३ सिटी न्यूज नेटवर्क
संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे चालू असलेली MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीनंतर गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आठ गुणासह आघाडीवर आहे तर पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स सात गुणासह द्वितीय स्थानावर आहे.एक गुणाने आघाडी घेत गतविजेती दिव्या सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल तृतीय मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन अर्जुन पुरस्कार विजेती गोव्याची आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ती कुलकर्णी आठवी मानांकित औरंगाबादची महिला ग्रँडमास्टर साक्षी चितलांगे,अकरावी मानांकित तामिळनाडूची महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री,नववी मानांकित कर्नाटकची महिला मास्टर ईशा शर्मा व पंधरा वी मानांकित तामिळनाडूची महिला ग्रँडमास्टर व्ही.वर्षीनी या सात जणी साडेसहा गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या या स्पर्धा दिल्लीच्या एम पी एल स्पोर्ट्स फाउंडेशनने प्रायोजित केले आहेत तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सह प्रायोजक आहे.चितळे डेअरी,जैन इरिगेशन जळगाव,एच टू इ सिस्टीम पुणे व फिरोदीया ग्रुप,अहमदनगर हे सहयोगी प्रायोजक आहेत.
विजेतेपदाची प्रबळ दावेदार गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख व तामिळनाडूच्या सी संयुक्ता यांच्यातील सिसीलीयन डिफेन्सने झालेल्या लढतीत सुरुवातीपासूनच दिव्याने आक्रमक चाली करत संयुक्ताला बचावात्मक खेळण्यास भाग पाडले. दिव्याने वजीराच्या सहाय्याने घोडा व हत्तीच्या नेत्रदीपक चाली करत संयुक्ताला निष्प्रभ केले व ३२ व्या चालीला विजय नोंदवीत पूर्ण गुण वसूल करत स्पर्धेतील आपली आघाडी मजबूत केली.
चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स व अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल यांच्यात चुरशीची लढत पहावयास मिळाली. इंग्लिश ओपनिंगच्या या डावात दोघींनीही सावध खेळ करत डावाची सुरुवात केली. रोमहर्षक झालेल्या या लढतीत वंतिकाने प्याद्याच्या कल्पक चाली रचत घोडा व हत्तीच्या सुंदर चाली करत मेरीच्या राजावर आक्रमण करत डावावर वर्चस्व राखले. परंतु मेरीने आपला अनुभव पणास लावत साडेचार तासाच्या झुंझार लढतीनंतर ४८ व्या चालीला डाव बरोबरीत ठेवण्यात यश मिळविले.
तिसऱ्या पटावर तृतीय मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन व कर्नाटकची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा तसेच चौथ्या पटावर औरंगाबादची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगे व तामिळनाडूची महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री यांनी अटीतटीत झालेली लढत बरोबरीत सोडवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.
पाचव्या पटावरील अर्जुन पुरस्कार प्राप्त गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णी व महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आशना मखीजा यांच्यातील रेटी ओपनिंगने झालेल्या चुरशीच्या लढतीत आशनाने १९ व्या चालीला केलेल्या घोडचूकीमुळे तिला घोडा गमवावा लागल्याने भक्तीने अवघ्या २० व्या चालीतच विजय मिळविला. तसेच महाराष्ट्राची महिला फिडे मास्टर मिथाली पाटील व कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारी यांच्यातील महत्वाच्या डावात ऋचाने अंतिम पर्वात हत्ती व राजाच्या अप्रतिम चाली रचत ३३ व्या चालीला मितालीवर मात करत स्पर्धेतील आपले आव्हान टिकवले आहे.
तसेच महाराष्ट्राची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हागवणे व हरियाणाच्या ईशवी अग्रवाल या मातब्बर खेळाडूंना तमिळनाडूच्या जी. तेजस्वीनी व राजस्थानच्या दक्षिता कुमावत यांनी पराभवाचा धक्का देत स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदविला. तर तेलंगणाच्या मानांकित साई पोटलुरीला कोल्हापूरच्या दिव्या पाटील ने बरोबरीत रोखत सर्वांचे लक्ष वेधून घेत सलग तिसरा दिवस गाजविला.



Comments
Post a Comment