एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीची अनुजा कोळी व मुंबईचा आदित्य कदम अजिंक्य
ॲडव्होकेट पी.आर.मुंडरगी स्मृती ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम पुरस्कृत
एच टू ई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीची अनुजा कोळी व मुंबईचा आदित्य कदम अजिंक्य
..संभाजीनगरची भूमिका वागळे व मुंबईचा रेयांश व्यंकट उपविजेते, कोल्हापूरच्या विवान सोनी व शौर्य बगाडीया ची महाराष्ट्र संघात निवड*
कोल्हापूर १ सिटी न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम मध्ये आयोजित केलेल्या ॲडव्होकेट पी. आर. मुंडरगी स्मृती एचटूई महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला मुलींची निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.
अंतिम आठव्या फेरीत मुलांच्या गटात पहिल्या पटावर अकरावा मानांकित मुंबईच्या आदित्य कदम विरुद्ध नववा मानांकित मुंबईचाच रेयांश व्यंकट यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. आदित्यने सात गुणासह अजिंक्यपद पटकाविले. रेयांशला साडेसहा गुणासह 40 बकोल्झ सरस टायब्रेक गुणामुळे उपविजेतेपद मिळाले. तेरावा मानांकित कोल्हापूरच्या शौर्य बागडीयाने पाचवा मानांकित मुंबईच्या निर्वाण शहाला बरोबरीत रोखले. चौथा मानांकित कोल्हापूरच्या विवान सोनी ने पंधरावा मानांकित नागपूरच्या मारस सिंग ला पराभूत केले तर चौथ्या पटावर सातवा मानांकित नागपूरच्या कुशाग्र पलीवाल ने 22 वा मानांकित मुंबईचा विहान अग्रवाल वर विजय मिळविला.रेयांश व्यंकट,कुशाग्र पलीवाल, विवान सोनी व शौर्य बांगडीया या चौघांचे समान साडेसहा गुण झाल्यामुळे बकोल्झ टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक देण्यात आला.
विजेत्या आदित्य कदमला रोख साडेतीन हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या रियांश व्यंकटला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविले. कुशाग्र पलीवाल ला तिसऱ्या क्रमांकाचे रोख अठराशे रुपये, विवान सोनीला चौथ्या क्रमांकाचे रोख पंधराशे रुपये तर शौर्य बागडियाला पाचव्या क्रमांकाचे रोख बाराशे रुपये देऊन सन्मानित केले.
मुलींच्या गटात अंतिम आठव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर चौथी मानांकित संभाजीनगरची भूमिका वागळे विरुद्ध ठाण्याची उत्तरा कार्तिक यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. दुसऱ्या पटावर बिगर मानांकित सांगलीच्या अनुजा कोळीने तिसऱ्या मानांकित रायगडच्या व्याघा बैजूला बरोबरीत रोखले. अनुजा कोळी व भूमिका वागळे या दोघींचे समान साडेसहा गुण झालेमुळे सरस बखोल्झ टायब्रेक(39.5) गुणानुसार अनुजाने बाजी मारली व अजिंक्य पदाला गवसणी घातली. कमी बकोल्झ टायब्रेक (38) गुणामुळे भूमिकाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या पटावर द्वितीय मानांकित सोलापूरच्या सान्वी गोरेने अमरावतीच्या हर्षी गुप्ताला पराभूत केले. विजेत्या अनुजा कोळीला रोख साडेतीन हजार रुपये व चषक तर उपविजेत्या भूमिका वागळे ला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविले. उत्तरा कार्तिकला तिसऱ्या क्रमांकाचे रोख अठराशे रुपये, सान्वी गोरेला चौथ्या क्रमांकाचे रोख पंधराशे रुपये तर हीया पाटील ला पाचव्या क्रमांकाचे रोख बाराशे रुपये देऊन सन्मानित केले.
ब्राह्मण सभा करवीर मंगलधामने अडव्होकेट अशोक मुंडरगी यांच्या सहकार्याने या स्पर्धा पुरस्कृत केल्या. त्याचबरोबर अश्विनी इंटरप्राईजेस चे गणेश कात्रुट यांचेही सहकार्य लाभले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मुंबईचे रघुनंदन गोखले, उद्योजक श्रीकांत पोतनीस, उद्योजक अभय देशपांडे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम चे अध्यक्ष संतोष कडोलीकर, खजिनदार रामचंद्र टोपकर, संचालक एन ए कुलकर्णी, ॲडव्होकेट पूजा जोशी, कपिलेश्वर पतसंस्थेचे संजय पाटील यांच्या उपस्थितीत व हस्ते करण्यात आला. प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले यांनी केले तर सूत्रसंचालन सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर ने केले यावेळी स्पर्धा प्रमुख धीरज वैद्य, मनीष मारूलकर, मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच सातारचे शार्दुल तपासे,उपमुख्य पंच इचलकरंजीचे राष्ट्रीय पंच करण परीट, राष्ट्रीय पंच आरती मोदी व सूर्याजी भोसले व प्रशांत पिसे उपस्थित होते .
कोल्हापुरात आयोजित केलेल्या या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ विक्रमी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो.. कोल्हापूरचा जसा कुस्तीत नावलौकिक आहे तसा बुद्धिबळात ही होत आहे याचा मला आनंद वाटतो..यामध्ये जिल्हा संघटनेचे योगदान मोठे आहे असे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यानी आपल्या मनोगतात व्यक्त केले.*
हैदराबाद येथे 4 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या अकरा वर्षाखालील मुला मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ निवड स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे
मुले
1) आदित्य कदम मुंबई 2) रेयांश व्यंकट मुंबई 3) कुशाग्र पलीवाल नागपूर 4) विवान सोनी कोल्हापूर 5) शौर्य बागडिया कोल्हापूर
मुली
1)अनुजा कोळी सांगली 2) भूमिका वागळे संभाजीनगर*
अन्य उत्तेजनार्थ बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे
*सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) अनिश जावळकर पुणे 2) अद्वेत कुलकर्णी कोल्हापूर 3) वृषांक माने कोल्हापूर
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुले
1) राघव रेणुक पावडे पुणे 2) नोवा जुयल अय्यर मुंबई 3) वरद चौधरी पालघर
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुली
1) विश्वजा देशमुख नागपूर 2) रिवा चरणकर सातारा 3)शाल्वी चषकार पुणे

Comments
Post a Comment