‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृतीची आंदोलनाद्वारे मागणी


‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृतीची आंदोलनाद्वारे मागणी 



कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख असल्याने अनेक वर्षांपासून शिवभक्त आणि हिंदू संघटनांद्वारे संताप व्यक्त होत आहे. काही शहरे, रेल्वेस्थानक, विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची नावे नंतर आदरयुक्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे आदरयुक्त स्वरूपात करण्याची आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 20 फेब्रुवारीला आंदोलनाद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आली. या आंदोलनास प.पू. कालीचरण महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. याचसमवेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,  विश्‍व हिंदु परिषद, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, सनातन संस्था, महाराष्ट्र मंदिर महासंघ, पतित पावन संघटना, बाल हनुमान तरुण मंडळ, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तरुण मंडळे यांचे २०० हून अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले ‘‘वर्ष 1962 साली घेतलेला निर्णय अंतिम असू शकत नाही. 60 वर्षांपूर्वीची कारणे आजही ग्राह्य धरता येणार नाहीत. यापूर्वी अनेक ऐतिहासिक संस्थांची नावे सुधारली गेली आहेत. वर्ष 1996 मध्ये ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले. नंतर वर्ष 2017 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असा संपूर्ण नावाचा उल्लेख करण्यात आला. तसेच ‘औरंगाबाद’ चे केवळ ‘संभाजीनगर’ नाव न ठेवता ते ‘छत्रपती संभाजीनगर’, अशी नावे बदलण्यात आली आहेत. याच धर्तीवर शिवाजी विद्यापीठाचे नावही ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करणे आवश्यक आहे.  असे नामकरण करण्यास जर कोणी विरोध करत असेल, तर ते धक्कादायक आहे. यामुळे दुर्दैवाने शिवाजी विद्यापीठ हे पुरागाम्यांचे अड्डा बनलाय का ? असा प्रश्‍नही या निमित्ताने उपस्थित होतो. 


ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव प्रत्येक जण आदराने घेतो त्या छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करून ‘शिवाजी कोण होता ?’, असे कॉ. पानसरे यांचे पुस्तक कसे काय विक्री होते ? त्यामुळे ‘शिवाजी कोण होता ?’  या पुस्तकाचे नाव त्वरित पालटावे, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा बदल न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी आम्ही समितीच्या वतीने देत आहोत. 

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद पाटील, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. शरद माळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘श्री’ संप्रदायाचे श्री. उमेश नरके, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस श्री. युवराज शिंदे, मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री. सुशील भांदिगरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील, भारत रक्षा मंचच्या सौ. सुजाता पाटील, हिंदु महासेभेचे श्री. विकास जाधव,  श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके, सर्वश्री सतीश पाटील, दीपक यादव, अर्जुन आंबी यांसह अन्य उपस्थित होते. |


हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत त्यांची श्रद्धास्थाने, अस्मिता, महापुरुष यांचा अवमान सहन करता कामा नये ! - प.पू. कालिचरण महाराज 



या प्रसंगी मार्गदर्शन करतांना प.पू. कालिचरण महाराज म्हणाले, ‘‘हिंदूंनी त्यांची श्रद्धास्थाने, अस्मिता, महापुरुष यांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन करता कामा नये. अशा अवमानांच्या विरोधात एकत्रित येऊन विरोध केला पाहिजे, यासाठी प्रसंगी आंदोलनही केले पाहिजे. हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने चाललेल्या या आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अशाच प्रकारे हिंदूंनी प्रयत्नशील राहून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.’’




Comments