"आप" ने नोटा उधळून केला भ्रष्ट महापालिका यंत्रणेचा निषेध
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचे आरोप करत त्याचे स्क्रिनशॉट सार्वजनिक केले आहेत. यामध्ये विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पवडी अकॉउंट्स विभागातील अधीक्षक, लेखापाल यांच्यापासून थेट शहर अभियंता, मुख्य लेखापाल ते अतिरिक्त आयुक्त या सर्वांना आपण बिल काढण्यासाठी टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदाराने केला आहे.
टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचरा पेट्यांना नोटा चारून, तसेच महापालिकेसमोर नोटा उधळून आम आदमी पार्टीने निषेध केला.
'मी टक्केवारी खातोय', 'मला पैसे खायला आवडतात', 'माझं पगारात भागत नाही' असे लिहलेल्या कचरा पेट्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
महापालिकेची कामे घेणाऱ्या ठेकेदारांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये याआधी देखील 18% इतकी रक्कम जमा केल्याशिवाय काम मिळणार नाही अशा आशयाचा मेसेज वायरल झाला होता. ड्रेनेज प्रकरणात खुद्द ठेकेदारानेच पुरावे दिल्याने महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचे पितळ आता उघड पडले असल्याची टीका आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.
पैसे खात निकृष्ट दर्जाचे काम करून शहराची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीच्या विश्वासहार्ते बद्दल शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंतांना या चौकशीसाठी नियुक्त करण्याची मागणी आप ने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतिफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयुर भोसले, लखन काझी, रमेश कोळी, चेतन चौगुले, आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment