शक्तीपीठ महामार्गाविरोधात 23 फेब्रुवारीला राज्यभर एल्गार; अधिवेशनादरम्यान मुंबईत गोलमेज परिषद
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात येत्या 23 फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गोलमेज परिषद घेऊन सरकारला जाब विचारण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील नेत्यांची ऑनलाईन झूम बैठक काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर सरकार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुढे रेटण्याच्या तयारीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यांतील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची दिशा निश्चित केली.
“लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प नको” – सतेज पाटील
आमदार सतेज पाटील म्हणाले, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग सरकारने राबवू नये. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते; मात्र आता भूमिका बदलल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गासाठीचा निधी सध्याच्या खड्डेमय रस्त्यांवर खर्च करावा, मोजणीला विरोध करावा आणि ग्रामसभांचे ठराव करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 23 फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन छेडले जाईल आणि विधिमंडळातही ठाम भूमिका मांडली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
“स्थानिकांचा तीव्र विरोध स्पष्ट” – राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणी आणि लातूरमधील घटनांचा निषेध केला. कोणतेही नेतृत्व नसताना शेतकरी रस्त्यावर उतरले, यावरून स्थानिकांचा विरोध स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होण्याची भीती व्यक्त करत, खाजगीकरणातून राबवण्यात येणाऱ्या या महामार्गाचा स्थानिकांना फायदा होणार नसल्याचा आरोप त्यांनी केला. 20 ते 25 फुट भरावामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल, असेही त्यांनी नमूद केले.
“प्रत्येक गावातून ठाम विरोध हवा” – कैलास पाटील
आमदार कैलास पाटील यांनी बाधित प्रत्येक गावातून तीव्र विरोध व्हायला हवा, असे सांगत आतापर्यंतची भूमिका कायम ठेवण्याचे आवाहन केले.
“करवीर तालुक्यातील गावे बाधित” – ऋतुराज पाटील
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी करवीर तालुक्यातील अनेक गावे या मार्गामुळे प्रभावित होणार असल्याचे सांगत सरकारने लोकांचा रोष लक्षात घ्यावा, असे म्हटले. मोठे आंदोलन उभे करून सरकारला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
“५०० एकर जमीन बाधित होणार” – राजेश पाटील
माजी आमदार राजेश पाटील यांनी बीडमधील घटनेचा निषेध करत चंदगड तालुक्यातील दहा गावांतून मार्ग जात असल्याने सुमारे 500 एकर शेती बाधित होणार असल्याचा आरोप केला. इको-सेंसिटिव्ह झोनमधूनही मार्ग नेला जात असल्याचा दावा करत गडहिंग्लज परिसरातून तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला.
“मोठ्या आंदोलनाची गरज” – गिरीष फोंडे
समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी परभणीतील घटनेचा निषेध करत 23 फेब्रुवारीच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आणि राज्यभर मोठे जनआंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली.
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनीही तीव्र निषेध व्यक्त करत नोटीस दिल्याशिवाय शेतात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला. बैठकीला कॉ. उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, अॅड. गजेंद्र येळकर, व्यंकटराव ढाकणे, सुभाष मोरलवार, बापूराव ढोरे यांचा सहभाग होता. धाराशिवचे संभाजी फरताडे यांनी आभार मानले.
राज्यातील नाशिक ते अक्कलकोट दरम्यान प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावर मोठ्या खर्चाचा आरोप करत, सरकारने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Post a Comment