कोल्हापुरात रविवारी शक्तिप्रदर्शन! युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे २ हजार दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत

 

 कोल्हापुरात रविवारी शक्तिप्रदर्शन! युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे २ हजार दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी (१ मार्च) कोल्हापुरात आगमन होत असून, त्यांच्या स्वागतासाठी २ हजार दुचाकी स्वारांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या जल्लोषी स्वागताचा निर्णय आज भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीस खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सांगितले की, कृष्णराज महाडिक यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड हा पक्षाचा निर्णय असून, पक्षाने दिलेली जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील. पक्षविस्तार आणि युवा कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यावर त्यांचा भर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फॉर्म्युला थ्रीपासून युवा नेतृत्वापर्यंतचा प्रवास

गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले कृष्णराज महाडिक सोशल मीडियावर ‘युथ आयकॉन’ म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंग स्पर्धेत उज्वल कामगिरी करत देश-विदेशात आपली छाप पाडली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच नामदार चंद्रकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनीही या निवडीचे स्वागत केले आहे.

स्वागत रॅलीचा मार्ग

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार,

  • दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौक येथून रॅलीला सुरुवात होईल.

  • शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल.

  • सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पक्ष कार्यालयात कृष्णराज महाडिक शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे भव्य स्वागत व्हावे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे. “कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान आहे,” असे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांचा सत्कार

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध समित्यांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता.

यावेळी राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवारी होणाऱ्या या भव्य रॅलीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Comments