उद्योगनगरीत क्रीडामहोत्सवाची धूम! ‘स्मॅक प्रीमियर लीग २०२६’चा जल्लोषात शुभारंभ

 उद्योगनगरीत क्रीडामहोत्सवाची धूम! ‘स्मॅक प्रीमियर लीग २०२६’चा जल्लोषात शुभारंभ

 : स्मॅक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डीवायएसपी वैष्णवी पाटील यांचा सत्कार करताना स्मॅक चेअरमन जयदीप चौगले; प्रसंगी सुरेंद्र जैन, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, मॅक अध्यक्ष मोहन कुशिरे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक बाबासो कोंडेकर, नगरसेविका पूजा पोवार, स्पर्धेचे प्रायोजक विजय सोमानी तसेच स्मॅकचे निमंत्रित सदस्य, उद्योजक व आयोजन समिती सदस्य उपस्थित.


कोल्हापूर (नागाव) सिटी न्यूज नेटवर्क २७ : 

Shiroli Manufacturers Association (SMAC), कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘स्मॅक प्रीमियर लीग - २०२६’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ शुक्रवारी शास्त्रीनगर मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात झाला. उद्योग क्षेत्रातील एकात्मता आणि सांघिक भावनेचा अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डीवायएसपी वैष्णवी एस. पाटील आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगरसेविका पूजा पोवार तसेच प्रमुख प्रायोजक टेक्नोमेट एंटरप्राईजेसचे विजय सोमानी उपस्थित होते.

क्रीडेमुळे उद्योग क्षेत्रात सुसंवाद

दरवर्षीप्रमाणे कारखानदार आणि कामगार यांच्यात सुसंवाद वाढावा, तणावमुक्त वातावरण निर्माण व्हावे आणि संघभावना बळकट व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती आयोजकांनी दिली.

डीवायएसपी वैष्णवी एस. पाटील यांनी आपल्या मनोगतात क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, खेळामुळे शिस्त, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन आणि संघभावना विकसित होते. उद्योग क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात. कामगार आणि उद्योजक एकत्र खेळल्याने संवाद वाढतो व सकारात्मक वातावरण निर्माण होते.

उपमहापौर अक्षय जरग यांनी स्मॅकच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, उद्योग संघटनांनी सामाजिक बांधिलकी जपणे ही काळाची गरज आहे. ही प्रीमियर लीग उद्योगजगतात सौहार्द आणि एकात्मता निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

१२ संघांमध्ये रंगणार चुरस

स्मॅक प्रीमियर लीगचे हे चौथे पर्व असून यंदा १२ उद्योजक संघांचा सहभाग आहे. यात झंवर ग्रुप चॅम्पियन्स, सरोज वॉरियर्स, कॅस्प्रो इलेव्हन, यश टायगर्स, हिंद फायटर्स, रत्ना स्ट्रायकर्स, कोहिनूर मेटॅलिक्स, ट्रायो चॅलेंजर्स, विश्वकर्मा वॉरियर्स, पिनॅकल-राज टेक्नो युनायटेड, मिस्टेर मार्व्हल्स आणि व्ही. पी. वॉरियर्स या संघांचा समावेश आहे.

स्पर्धेतील सामने ७ षटकांचे असून अंतिम सामन्यासह एकूण १९ सामने खेळवले जाणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सामने रंगणार असून सायंकाळचे सामने प्रकाशझोतात पार पडणार आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी ऑ. सेक्रेटरी रणजीत जाधव, खजानिस बदाम पाटील, सुवर्णमहोत्सव समिती अध्यक्ष सुरेन्द्र जैन, निमंत्रित सदस्य ॲड. अशोक उपाध्ये, सचिन बुधले, शरद पाटील, भीमराव खाडे, अजिंक्य तळेकर, मोहन जाधव, रामराजे बदले, भरत सोमय्या, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक बाबासो कोंडेकर, उद्योजक विजय पाटील, दीपक घोंगडी, काका पाटील तसेच संयोजन समिती सदस्य ओंकार भगत, अभिषेक सोनी, अभिषेक झंवर, श्रीराम सुरवसे, साहील मोमीन, कुणाल कट्टी, प्रेम शिंदे, धवल पाटील आदी उपस्थित होते.

स्पर्धेची सांगता व बक्षीस वितरण समारंभ शनिवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

उद्योगनगरीत सध्या ‘स्मॅक प्रीमियर लीग’चा जल्लोष रंगत असून क्रीडारसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments