मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : तक्रारींसाठी “१८१” महिला हेल्पलाईन कार्यान्वित


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : तक्रारींसाठी “१८१” महिला हेल्पलाईन कार्यान्वित


 मंत्री आदिती तटकरे यांची माहिती | आमदार राजेश क्षीरसागर यांच्या तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर



कोल्हापूर, दि. २८ सिटी न्यूज नेटवर्क 

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उद्भवणाऱ्या तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून “१८१” हा महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळात लेखी उत्तराद्वारे दिली.


तत्कालीन मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना राज्यभर पोहोचली असून कोट्यवधी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही योजना अखंडित सुरू आहे.


मात्र, योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (Aadhaar Authentication) अनिवार्य केल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. ऑनलाईन अर्ज भरताना चुकीचे पर्याय निवडणे, माहितीतील त्रुटी किंवा तांत्रिक कारणांमुळे लाखो महिला अपात्र ठरल्याची बाब ऑक्टोबर २०२५ मध्ये निदर्शनास आली होती.


यासंदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करत,

 अर्ज दुरुस्ती (Correction Window) उपलब्ध करून देण्याबाबत

* ई-केवायसी पूर्ण करूनही हप्ता न मिळालेल्या महिलांच्या तक्रारी

* ग्रामीण व अल्पशिक्षित महिलांसाठी सहाय्य केंद्रे किंवा मार्गदर्शन शिबिरे

* मुदतवाढ देण्याबाबत शासनाची भूमिका

याबाबत विचारणा केली होती.


३१ मार्च २०२६ पर्यंत सुधारणा संधी


मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरानुसार, ई-केवायसी प्रक्रिया दि. १८ सप्टेंबर २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडली. त्यानंतर पात्र महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.


ज्या लाभार्थी महिलांकडून अनावधानाने चुकीचा पर्याय निवडला गेला आहे, त्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत एकदाच सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे.


 “१८१” हेल्पलाईनद्वारे तातडीचे मार्गदर्शन

योजनेतील तांत्रिक अडचणी, हप्ता रखडणे, बँक खात्यात रक्कम न जमा होणे किंवा अर्जातील माहितीतील त्रुटी यासंदर्भातील तक्रारींसाठी महिला व बालविकास विभागाची “१८१” महिला हेल्पलाईन** सुरू करण्यात आली आहे.


या हेल्पलाईनवर विशेष प्रशिक्षित कॉल ऑपरेटर्स तैनात असून ते महिलांना थेट मार्गदर्शन करतात. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे.

 📌 लाडक्या बहिणींनी “१८१” चा उपयोग करावा – आमदार राजेश क्षीरसागर

ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे लाभ थांबला असल्यास किंवा कोणतीही शंका असल्यास महिलांनी १८१ हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.


योजनेच्या अटी, पात्रता, अर्ज दुरुस्ती व तांत्रिक अडचणींसंदर्भात तातडीने मार्गदर्शन मिळावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments