शाळेतील संस्कार हीच भविष्याची शिदोरी – हेमंत वारके

शाळेतील संस्कार हीच भविष्याची शिदोरी – हेमंत वारके

तुरंबे येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ; गुणवंतांचा गौरव



कोल्हापूर (सरवडे), २३ – सिटी न्यूज नेटवर्क

“दहावी हा आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. शाळेत मिळालेले संस्कार, शिस्त आणि शिक्षण हेच यशाचे खरे भांडवल ठरते. उच्च ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी परिश्रमांची तयारी ठेवा,” असे प्रेरणादायी आवाहन हेमंत वारके यांनी केले.


ते तूरंबे (ता. राधानगरी) येथील मारुतीराव वारके (आबाजी) विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. पाटील होते.


हेमंत वारके पुढे म्हणाले, “यशासाठी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. परिश्रमाला पर्याय नाही. अपयश आले तरी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा उभे राहण्याची जिद्द ठेवा.”


अध्यक्षीय भाषणात एस. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची जपणूक करत आधुनिक ज्ञानाची कास धरण्याचा सल्ला दिला. “पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच उज्ज्वल भवितव्य घडते,” असे ते म्हणाले.


कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रेया शेटगे, वेदिका पाटील, निखिल खराडे, तहूर जमादार, समीक्षा बैलकर, दर्शना सावंत, मृणाल खोत, शौर्य तहसीलदार, हर्षवर्धन भोईटे, अथर्व चौगले आणि गंधर्व येरुडकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.



यावेळी बी. ए. लोंढे, आर. एस. कुदळे, आर. बी. कांबळे, दत्तात्रय कांबळे, नामदेव सिद्रुक आदी उपस्थित होते. व्ही. जे. साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर बी. ए. लोंढे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या वाटचालीसाठी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments