“देहदानातून जीवनाला नवी संजीवनी” — राज्यस्तरीय एकदिवशीय देहांगदान कार्यशाळा उत्साहात संपन्न

 

“देहदानातून जीवनाला नवी संजीवनी” — राज्यस्तरीय एकदिवशीय देहांगदान कार्यशाळा उत्साहात संपन्न



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 


शिवाजी विद्यापीठ येथील राजर्षी शाहू सिनेट सभागृहात विविध सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मासिक शिखरावरीच्या दशकपूर्ती निमित्ताने अवयवदान–देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा शनिवारी (दि. 21 फेब्रुवारी 2026) यशस्वीरित्या पार पडली. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत राज्यभरातील तज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Federation of Organ and Body Donation, Yashodarshan Foundation, Zonal Transplant Coordination Centre (ZTCC), Rotary Club of Kolhapur, Aster Aadhar Hospital यांसह अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. देहदान जीवनदायी समाजसेवी संस्था, ऑर्गन्स फाउंडेशन, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, जागृत नागरिक सेवा संस्था, प्रज्ञा शिक्षण प्रतिष्ठान, स्नेहबंधन ट्रस्ट मुंबई, विंग ऑफ हार्ट फाउंडेशन आदी संस्थांचा सक्रिय सहभाग होता.

कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
डॉ. दिलीप पटवर्धन यांनी त्वचादान, नेत्रदान व देहदानाचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट करत तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. श्रीकांत आपटे यांनी देहदानामुळे वैद्यकीय संशोधन आणि नवीन डॉक्टरांच्या शिक्षणाला मोठी चालना मिळते, असे सांगितले.

डॉ. शिबा वाकडे यांनी कोमामधील रुग्ण आणि मेंदूमृत व्यक्ती यांतील फरक स्पष्ट करून अंधश्रद्धा व सामाजिक गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली. डॉ. राजेश शेट्टी यांनी विविध एनजीओंनी समन्वयाने काम केल्यास जनजागृती अधिक प्रभावी होईल, असे सांगितले. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अल्पावधीत अवयवदान प्रक्रिया सुलभ करता येते, यावर त्यांनी भर दिला.

डॉ. मीरा सुरेश यांनी धार्मिक व मानसिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी संस्थांनी समन्वयकाची भूमिका सक्षमपणे पार पाडावी, असे मत व्यक्त केले. डॉ. स्नेहल हांडे यांनी रुग्णांच्या प्राथमिक उपचारांचे महत्त्व आणि नातेवाईकांच्या सकारात्मक मानसिकतेची गरज अधोरेखित केली. डॉ. राजेश डोके यांनी ICU मधील गुंतागुंतीच्या परिस्थितीत सुसंवादाचे महत्त्व सांगत केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक योजनांची माहिती दिली.

डॉ. अमोल कोडोलीकर यांनी देशातील ‘ग्रीन कॉरिडॉर’ संकल्पनेद्वारे अवयव वेळेत पोहोचवण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. डॉ. कृष्णा सिंग यांनी हात प्रत्यारोपणातील अडचणी, उपाययोजना व खर्च याविषयी माहिती दिली. डॉ. कैलास जवादे यांनी एक व्यक्ती आयुष्याच्या उत्तरार्धात ५४ जणांना विविध प्रकारे जीवनदान देऊ शकतो, असे सांगत सामाजिक संस्थांची जबाबदारी अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी योगेश अग्रवाल (यशोदर्शन फाउंडेशन) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सुरेश केसरकर यांनी आभार मानले. शेवटच्या सत्रात सर्व सहभागींचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांना रोपटे, शिखरावरी अंक, यशोदर्शन फाउंडेशनचा वार्षिक अंक व दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गुणवंत कामगार संजय सासने, भगवान माने, महादेव चक्के तसेच Dr. D. Y. Patil Medical College, Government Medical College, नर्सिंग कॉलेज CPR कोल्हापूर, तसेच तीन जिल्ह्यांतील NSS विद्यार्थी-विद्यार्थिनी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही कार्यशाळा अवयवदान–देहदान चळवळीला नवे बळ देणारी ठरली असून समाजामध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

Comments