स्मार्ट मीटर सक्तीला विरोध; ग्राहकांच्या संमतीशिवाय बसवू नयेत
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कडे ठाम मागणी
कोल्हापूर, दि. २८ सिटी न्यूज नेटवर्क
राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात वीज ग्राहकांमध्ये वाढता असंतोष पाहता स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे करू नये, अशी ठाम मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले की, अनेक ठिकाणी वीज ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रकार घडत आहेत. नवीन स्मार्ट मीटर बसविताना जुन्या मीटरचा क्रमांक, शेवटचे रिडींग, नवीन मीटरचा क्रमांक, सुरुवातीचे रिडींग, ग्राहकाचे नाव, सही व मोबाईल क्रमांक याची नोंद घेणे आवश्यक आहे. ग्राहकाची स्पष्ट परवानगी नसताना मीटर बसवू नये, अशी त्यांनी मागणी केली.
⚡ सोलर ग्राहकांना वाढीव बिलांचा फटका
सोलर प्रणाली बसविलेल्या ग्राहकांना स्मार्ट मीटरनंतर चुकीची व वाढीव बिले येत असल्याची तक्रार करण्यात आली. बिलाबाबत विचारणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी योग्य स्पष्टीकरण देत नाहीत, तसेच वसुली विभाग उध्दट भाषेत बोलतो, असा आरोपही करण्यात आला. बिल दुरुस्ती प्रक्रिया सुरू असताना वीज कनेक्शन तोडण्याची घाई केली जाते, यावर आळा घालावा, अशी मागणी चेंबरने केली.
मानद सचिव अजित कोठारी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर सक्ती न करण्याचे निर्देश दिले असतानाही कर्मचारी सक्ती करत आहेत. सोलर बसविल्यानंतर सुरुवातीला सरासरी बिले आली; मात्र नंतर प्रचंड वाढ झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पीएम-सूर्य घर योजना’ योजनेलाही फटका बसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
चुकीची आलेली मोठी बिले एकरकमी भरण्याचा आग्रह केला जातो आणि पुढील बिलातून समायोजनाचे आश्वासन दिले जाते; परंतु प्रत्यक्षात फरकाची रक्कम परत मिळण्यास दोन वर्षांचा कालावधी लागतो. ही रक्कम चेकद्वारे तातडीने परत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
📄 थकबाकी नसल्याचे एनओसी देण्याची मागणी
अमर क्षीरसागर यांनी सांगितले की, नवीन स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी जुन्या मीटरची थकबाकी नसल्याचे एनओसी ग्राहकांना द्यावी. अन्यथा काही महिन्यांनंतर जुन्या मीटरची थकबाकी बिले येत असल्याचे प्रकार घडत आहेत.
कोल्हापूर सोलर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल होनोले यांनी नमूद केले की, सोलर ग्राहकांच्या बिलामध्ये इम्पोर्ट रिडींग दिसते; मात्र एक्स्पोर्ट व जनरेशन रिडींगचा तपशील नसतो. नेट मीटर असलेल्या ग्राहकांचे अनेक महिने रिडींग न घेतल्याने अचानक मोठ्या रकमेची बिले येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जनजागृती व शिबिर आयोजित करण्यास असोसिएशन सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
🏢 विशेष बिल दुरुस्ती शिबिराचे आश्वासन
महावितरणचे शहर विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी बिलांबाबतच्या शंका दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष बिल दुरुस्ती शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी चेंबरचे मानद सचिव प्रशांत शिंदे, संचालक राहुल नष्टे, संपत पाटील, अभिजीत विचारे, धनाजी एकल, धैर्यशील जाधव आणि प्रथमेश सूर्यवंशी उपस्थित होते.

Comments
Post a Comment