मेन राजाराममध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
“मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती व अभिमान आहे” – डॉ. संतोष माने
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क :
मातृभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती, इतिहास आणि ओळख जपणारी शक्ती आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि सर्जनशीलता वाढीस लागते. इंग्रजीसह जागतिक भाषांचे ज्ञान करिअर आणि तंत्रज्ञानासाठी आवश्यक असले, तरी मराठी भाषेविषयी नितांत आदर आणि आपुलकी असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. संतोष माने यांनी केले.
ते जिल्हा परिषद, कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन खाडे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून आपला सांस्कृतिक वारसा, स्वाभिमान आणि आत्मविश्वास आहे. सोशल मीडियाच्या युगात हा स्वाभिमान जपत संस्कृतीचा लामणदिवा तेवत ठेवणे ही काळाची गरज आहे.”
या दिनाचे औचित्य साधून कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘पत्रास कारण की’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी सद्यपरिस्थितीत मराठी भाषेची स्थिती वास्तवदर्शीपणे मांडणारी पत्रे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांना लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. या उपक्रमात उत्कृष्ट सहभाग नोंदविल्याबद्दल सलोनी बारे, श्रेया कळंत्रे, मेहजबीन मुल्लाणी, सिद्धी शरद पाटील, संध्या पोवार, जान्हवी शेवरे, स्वराजंली पाटील, अनुराधा सिद्धनेर्ली व प्रियांका यादव या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सलोनी बारे व श्रेया कळंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब माळवे यांनी केले. फलकलेखन विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी तर आभार अनिल लाड यांनी मानले.
यावेळी उपप्राचार्या वनिता खडके, बाबुराव यादव, हर्षवर्धन काटकर, संजय कुंभार, राहुल देशमुख, अयोध्या धुमाळ, दिपा लोहार, प्रमिला मळगे, राजू मोरे, संगिता चव्हाण तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान आणि जागरूकता निर्माण झाली असून, मातृभाषेच्या जतनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

Comments
Post a Comment