हुपरी येथे होणाऱ्या हिंदु-राष्ट्र जागृती सभेला पू. भगवान डोणे महाराज यांचे आशीर्वाद
कोल्हापूर (हुपरी ) २६ सिटी न्यूज नेटवर्क
हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु-राष्ट्र जागृती सभेला हालसिद्धयात्रेत भाकणूक करणारे पू. भगवान डोणे महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत. “राष्ट्र आणि धर्मजागृतीचे जे कार्य समितीमार्फत सुरू आहे ते निश्चित यशस्वी होईल. या कार्याला आता अधिक गती मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रविवार, १ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे हिंदु-राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पू. भगवान डोणे महाराज यांची भेट घेऊन सभेचे निमंत्रण दिले व त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी शाल व श्रीफळ देऊन पू. भगवान डोणे महाराज यांचा सन्मान केला. या प्रसंगी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, समितीचे श्री. महेंद्र अहिरे, कु. प्रतिभा तावरे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदु-राष्ट्र जागृती सभेबाबत परिसरात उत्सुकता निर्माण झाली असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Comments
Post a Comment