बालिंगे बनले आदर्श गावाच्या दिशेने; सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न

 

बालिंगे बनले आदर्श गावाच्या दिशेने; सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न


कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

बालिंगे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत इमारत व पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीने हा विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला.

या प्रकल्पाचे लोकार्पण आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार संजयदादा मंडलिक होते. आपल्या मनोगतात मान्यवरांनी सौरऊर्जा हा काळाची गरज असल्याचे नमूद करत बालिंगे ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक आणि बचतप्रधान निर्णय घेतल्याचे कौतुक केले.

सौरऊर्जा प्रकल्पामुळे पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून ग्रामपंचायतीला आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच भविष्यातील वाढत्या वीजदरांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प गावासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत उगले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मधुकर शामराव जांभळे, अमर मारुती जत्राटे, जनेंद्र वाढोणकर, माजी उपसरपंच श्रीकांत नागनाथ भवड, माजी सरपंच अनिल यशवंत पोवार , जनार्दन जांभळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच संदीप शशिकांत सुतार यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बालिंगे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गाव आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Comments