आत्मसमर्पण दिनी कोल्हापुरात राष्ट्रभक्तीचा दिमाखदार सोहळा
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार” शहीद मेजर शामकांत केळकर यांच्या पत्नींना प्रदान
कोल्हापूर, दि. २६ सिटी न्यूज नेटवर्क
आत्मसमर्पण दिनाच्या पावन औचित्यावर अखिल भारत हिंदू महासभा, कोल्हापूर जिल्हा (स्थापना – १९१५) यांच्या वतीने राष्ट्रनिष्ठा, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाचा गौरव करणारा भावपूर्ण सोहळा कोल्हापुरात संपन्न झाला. राष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद वीरांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार” वितरण समारंभ राष्ट्रभक्तीचा साक्षात उत्सव ठरला.
यंदाचा “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार” १९७१ च्या ऑपरेशन कॅक्टस लिली दरम्यान अद्वितीय शौर्य दाखवत वीरमरण पत्करणारे मेजर शामकांत गजानन केळकर (सेवा क्रमांक: IC-11231, युनिट: 4/5 गढवाल रायफल्स, वीरमरण दिनांक: ४ डिसेंबर १९७१) यांच्या पत्नी सौ. शैलजा श्यामकांत केळकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
मेजर केळकर यांच्या बलिदानाची गाथा स्मरणात ठेवत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू दाटून आले आणि सभागृह राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले.
हा पुरस्कार राज्य संघटक मनोहर सोरप, संघटनमंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील आणि रश्मीताई साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपल्या मनोगतात मान्यवरांनी “राष्ट्रासाठी दिलेले बलिदान हे शब्दांच्या पलीकडचे असते; तेच खरे राष्ट्रधर्माचे सर्वोच्च रूप आहे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रम दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी नागाळा पार्क, कोल्हापूर येथील मेजर केळकर यांच्या निवासस्थानी पार पडला. शहीदांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रभक्तीपर विचारमंथन आणि पुरस्कार वितरण सोहळा शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
या ऐतिहासिक सोहळ्यास मेजर केळकर यांच्या कुटुंबीयांमधील योगिता कुलकर्णी, मानिनी श्रीधर गोरे, मधुजा श्रीधर गोरे, सविता दिवसे तसेच किशोर घाटगे, सुरेश जाधव, बबन खोपकर, विजय पाटील आणि जिल्हा प्रवक्ते सुनील सामंत यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार” हा केवळ सन्मान नसून राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या वीरांच्या स्मृतीप्रती व्यक्त केलेली सामूहिक कृतज्ञतेची भावना आहे. कोल्हापुरात पार पडलेला हा भावनिक आणि ऐतिहासिक सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments
Post a Comment