हुपरी येथे १ मार्चला ‘हिंदू राष्ट्र-जागृती सभा’; आमदार टी राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती

 

हुपरी येथे १ मार्चला ‘हिंदू राष्ट्र-जागृती सभा’; आमदार टी राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती



कोल्हापूर (हुपरी) २५ सिटी न्यूज नेटवर्क 

– हिंदू राष्ट्र स्थापनेच्या मागणीसाठी १ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे ‘हिंदू राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भाग्यनगर (हैदराबाद) येथील आमदार व श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष टी राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चांदी कारखानदार असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे हातकणंगले तालुका संयोजक श्री. नितीन काकडे, ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकर ससे, अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे व श्री. संजय पाटील, भाजपचे मंडलप्रमुख श्री. सुभाष गोटखिंडे, तसेच विश्‍व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री श्री. निळकंठ माने उपस्थित होते.

१०० हून अधिक गावांत प्रचार मोहीम

सभेच्या पार्श्वभूमीवर हुपरी शहरासह परिसरातील १०० हून अधिक गावांत व्यापक प्रचार सुरू असल्याचे श्री. आदित्य शास्त्री यांनी सांगितले. विविध तरुण मंडळे, महिला गट आणि ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत असून हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्षा, होर्डिंग्ज आणि सामाजिक माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. विविध लोकप्रतिनिधींनाही निमंत्रणे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री. दिनकर ससे म्हणाले की, व्यापारी वर्गात सभेबाबत उत्साह असून मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित राहणार आहेत. सद्गुरु स्वाती खाडये यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर युवतींनी शारीरिक, मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज व्यक्त केली. या संदर्भात सभेत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हिंदू राष्ट्र-जागृती सभा’चा उद्देश

श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, या सभा हिंदू समाज व धर्मावर होणाऱ्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी घेतल्या जात आहेत. धर्म आणि राष्ट्राप्रती कर्तव्यभावना वृद्धिंगत करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. देशभरात अशा २,२८२ हून अधिक सभा आयोजित केल्या असून लाखो नागरिक उपस्थित राहिल्याचा दावा त्यांनी केला.

२८ फेब्रुवारीला वाहनफेरी

सभेच्या प्रचारासाठी शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता हुपरी येथील जवाहर चौपाटी येथून वाहनफेरी काढण्यात येणार आहे. वाळवेकर नगर, छत्रपती शिवाजीनगर, महावीरनगर, चिटणीस चौक मार्गे शिवमूर्ती, माळभाग येथे फेरीची सांगता होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


सभेचा तपशील :

  • दिनांक: रविवार, १ मार्च २०२६

  • वेळ: सायं. ५.३० वा.

  • स्थळ: हुतात्मा स्मारक, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

Comments