करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; सभापती राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील तर उपसभापती भाजपच्या दिपाली पाटील बिनविरोध
करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; सभापती राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील तर उपसभापती भाजपच्या दिपाली पाटील बिनविरोध
कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क
करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीने सत्ता स्थापन करत आपला झेंडा फडकवला आहे. तब्बल ६५ वर्षे कायम असलेल्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत महायुतीने पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले. आज झालेल्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील यांची सभापतीपदी, तर भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने २४ पैकी १६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७, भारतीय जनता पक्षाने ६ तर शिवसेनेने ३ जागांवर विजय मिळवला होता.
सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्याचप्रमाणे उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांचा देखील एकमेव अर्ज आल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून विजयी झाले असून दिपाली पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून निवडून आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार अमल महाडिक यांनी महायुतीमध्ये समन्वयाची भूमिका निभावत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापती पदावर भाजपला संधी मिळाली आहे.
या निवडीमुळे करवीर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.

Comments
Post a Comment