भक्तीमय वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्साहात संपन्न

 भक्तीमय वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज उत्साहात संपन्न



कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क 

 जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवानिमित्त तुकाराम शाहू मार्केट यार्ड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तीभावाने आणि उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. पहाटेच्या पवित्र वातावरणात महाराजांना अभिषेक करण्यात आला.




दुपारी बारा वाजता संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. स्थानिक नूतन नगरसेविका सौ. प्राजक्ता अभिषेक जाधव तसेच शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव दळवी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी टाळ-चिपळ्यांच्या गजरात नामस्मरण करत भक्तीमय वातावरण निर्माण केले.



कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळपासून भजन-कीर्तन आणि हरिनाम संकीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता.


यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, महिला वर्ग, आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर कमिटीचे वारके यांनी मंदिराचे महत्त्व तसेच तुकाराम बीजाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.


संपूर्ण परिसर “ग्यानबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात तुकाराम बीज सोहळा संपन्न झाला.

Comments