गडहिंग्लज आणि आजरा शहरांना बायपासची मागणी; खासदार धनंजय महाडिक यांचा संसदेत पाठपुरावा

 गडहिंग्लज आणि आजरा शहरांना बायपासची मागणी; खासदार धनंजय महाडिक यांचा संसदेत पाठपुरावा




कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क 

 संकेश्‍वर ते आंबोली हा चार पदरी कॉंक्रीटचा महामार्ग पूर्ण झाला असला, तरी हा मार्ग गडहिंग्लज आणि आजरा शहरांच्या बाजारपेठेतून जात असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र बायपास रस्ता तयार करावा, अशी आग्रही मागणी खासदार Dhananjay Mahadik यांनी संसदेत केली.

संसदेच्या अधिवेशनात बोलताना खासदार महाडिक यांनी संकेश्‍वर – आंबोली – बांदा या नव्या महामार्गाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. मात्र हा महामार्ग गडहिंग्लज आणि आजरा शहरांच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अपघातांची तीव्रता वाढल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली. त्यामुळे दोन्ही शहरांना बाह्य मार्ग (बायपास) देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी सांगितले की, गडहिंग्लज आणि आजरा शहरांसाठी बायपास रस्त्याचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे आला आहे. सध्या या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे.

याचबरोबर कोल्हापूर ते सांगली चार पदरी महामार्गाच्या कामाबाबतही खासदार महाडिक यांनी प्रश्न उपस्थित केला. सुमारे १ हजार १९२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावर काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने त्यावर तोडगा काढल्याने आता या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात या प्रकल्पाची निविदा मंजूर होण्याची शक्यता असून जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच कोल्हापूर ते सांगली चार पदरी महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.



Comments