कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय; जिल्हास्तरीय युवा आघाडी बैठकीत कामांची आखणी


कृष्णराज महाडिक पक्षीय कामात सक्रिय; जिल्हास्तरीय युवा आघाडी बैठकीत कामांची आखणी



कोल्हापूर, दि. ४ सिटी न्यूज नेटवर्क 

 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरात जिल्हास्तरीय युवा आघाडीची बैठक घेऊन संघटनात्मक बांधणी व आगामी उपक्रमांची सविस्तर आखणी केली. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नुकतीच प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाडिक यांनी आपल्या कामकाजाला वेगाने प्रारंभ केला असून, कोल्हापुरातील भाजप कार्यालयात त्यांनी ही महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीस जिल्हाध्यक्ष विश्‍वजीत पवार, प्रशांत बुगले, रविश पाटील-कौलवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना महाडिक म्हणाले की, राज्यभरात किमान एक लाख युवा सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी १५ ते २० हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आले आहे. भाजपची शिस्तबद्ध पक्ष म्हणून असलेली प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

युवतींसाठी युवा मोर्चाचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याबरोबरच रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि क्रीडा क्षेत्रातील संधी वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच येत्या मे महिन्यात कोल्हापुरात युवा आघाडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्याचे नियोजन असून, त्याची तयारी मार्च महिन्यापासून सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष विश्‍वजीत पवार यांनी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा शब्द दिला. विरोधकांकडून केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात खोटे कथानक तयार केले जात असल्याचा आरोप करत, त्यास प्रभावीपणे उत्तर देण्याचा इशारा प्रशांत बुगले यांनी दिला. रविश पाटील-कौलवकर यांनी महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात युवा शाखा विस्तारल्या जातील व विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही दिली.

पहिल्याच बैठकीत प्रदेशाध्यक्ष महाडिक यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, युवा मोर्चाची पुढील वाटचाल अधिक जोमाने होणार असल्याचे चित्र दिसून आले. बैठकीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments