कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटप फॉर्म्युला निश्चित; ५ वर्षांत ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती
कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटप फॉर्म्युला निश्चित; ५ वर्षांत ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती
कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. आगामी पाच वर्षांत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांचे रोटेशन निश्चित करण्यात आले असून, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद सव्वा वर्षासाठी तर चार सभापती पदे एक वर्षासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महायुतीच्या ५१ सदस्यांपैकी सुमारे २८ सदस्यांना या कालावधीत पदाची संधी मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण ६८ जागांपैकी महायुतीने ५१ जागांवर विजय मिळवला असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०, भाजपच्या १२, शिवसेनेच्या ९, शाहू आघाडीच्या ४, जनसुराज्य पक्षाच्या ५ आणि एक अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. या बहुमतीमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर महायुतीचा ठप्पा बसणे निश्चित झाले आहे.
सत्ताधाऱ्यांच्या बैठकीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा रविवारी कोल्हापूर विमानतळावर झाली. बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रा. जयंत पाटील, जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि माजी आमदार सुजीत मिणचेकर उपस्थित होते.
बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसोबतच बांधकाम व आरोग्य, अर्थ व शिक्षण, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण या चार सभापती पदांसाठी रोटेशन फॉर्म्युला निश्चित केला गेला. उपाध्यक्षांकडे कृषी व पशुसंवर्धन समितीची जबाबदारी राहणार आहे.
यादरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक १७ मार्च रोजी होणार आहे, मात्र कोणत्या पक्षाला आणि सदस्याला पहिले टप्प्यात हे पद मिळणार, याची उत्सुकता अद्याप कायम आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात सस्पेन्स कायम आहे.

Comments
Post a Comment