कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देणार – आमदार राजेश क्षीरसागर


कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देणार – आमदार राजेश क्षीरसागर 



शेंडापार्क येथे ३४.३६ हेक्टरवर आयटी पार्क; शाहू मिल्स परिसरात स्मारक आणि टेक्स्टाईल टुरिझम हब उभारणीची योजना

कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क 
कोल्हापूर शहराला औद्योगिक, आयटी आणि पर्यटन क्षेत्रात वेग देऊन महाराष्ट्रातील टॉप १० विकसित शहरांमध्ये स्थान मिळवून देण्याचा संकल्प असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूरातील आयटी पार्क प्रकल्प तसेच छत्रपती शाहू मिल्स परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारक आणि टेक्स्टाईल टुरिझम हबबाबत माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोल्हापूर हे देशातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या शहरांपैकी एक असून नागरी सुविधा आणि विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महत्त्वाचे टियर-२ शहर म्हणून ओळखले जाते. शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातही कोल्हापूरने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी आयटी पार्क आणि पर्यटन प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळेल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

शेंडापार्क येथे उभारणार अत्याधुनिक आयटी पार्क

कोल्हापूरातील शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) वर्ग करण्यास राज्य मंत्रिमंडळाने ५ मार्च २०२६ रोजी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

गट क्रमांक ५८३, ५८७ आणि ५८८ मधील जमीन आयटी पार्कसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून येथे अत्याधुनिक सुविधा असलेला आयटी पार्क विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

शाहू मिल्स परिसरात टेक्स्टाईल टुरिझम हब

छत्रपती शाहू मिल्सच्या ऐतिहासिक जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसा भव्य स्मारक प्रकल्प आणि टेक्स्टाईल टुरिझम हब उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या प्रकल्पास तत्वत: मंजुरी दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या प्रकल्पात राजर्षी शाहू महाराज आणि करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या इतिहासाचे दर्शन घडवणारे स्मारक व संग्रहालय, शाहू मिल म्युझियम, टेक्सटाइल इंजिनिअरिंग कॉलेज, फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, फॅब्रिक डिझाइन इन्स्टिट्यूट, तसेच १००० ते १२०० आसन क्षमता असलेले अत्याधुनिक ऑडिटोरियम उभारण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय कोटीतीर्थ तलाव परिसराचे सुशोभीकरण करून पर्यटन वाढीसाठी अॅम्युझमेंट पार्क उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या व माजी आमदार जयश्रीताई जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, रत्नेश शिरोळकर, सत्यजित जाधव, स्वरूप कदम, वैभव माने, प्रसाद चव्हाण तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(

Comments