ज्ञानासोबत कौशल्यांचा संगम आवश्यक : प्राचार्य संतोष मोरे
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात ‘अंकुरम २०२६’ उत्साहात संपन्न
कोल्हापूर (तिटवे) ०२ सिटी न्यूज नेटवर्क
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष कौशल्ये, नवकल्पना आणि तांत्रिक प्रावीण्य यांचा संगम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण यशासाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन केपीआयटी कॉलेजचे प्राचार्य संतोष मोरे यांनी केले. ते येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे आयोजित ‘अंकुरम २०२६’ या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. विज्ञान दिनानिमित्त आयक्यूएसी विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे मानवी जीवन अधिक सुलभ, वेगवान आणि परिणामकारक झाले आहे. मात्र या साधनांचा वापर जबाबदारीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रिसर्च प्रोजेक्ट स्पर्धेत स्नेहा खानापुरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. अनुजा बुरुड व श्रावणी चौगले यांनी द्वितीय, तर मयुरी पाटील व शितल पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत अनिकेत पाटील व सिद्धेश पाटील यांनी प्रथम, तर सोनम पाटील व सानिया माने यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
सी प्रोग्रामिंग स्पर्धेत विनयराज कोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विजया बेलवळे व वंशिका बेलवळे यांनी संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक मिळवला.
पर्यावरण जनजागृती रील मेकिंग स्पर्धेतही विनयराज कोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. वेदांत पाटील व आदित्य कांबळे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. उपप्राचार्य सागर शेटगे, विशालसिंह कांबळे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी परबकर यांनी केले, तर आभार प्रा. दिग्विजय कुंभार यांनी मानले.

Comments
Post a Comment