अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ कायदा संमत करा : हुपरीतील हिंदू राष्ट्र-जागृती सभेत ११ हजार हिंदूंची मागणी

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ कायदा संमत करा : हुपरीतील हिंदू राष्ट्र-जागृती सभेत ११ हजार हिंदूंची मागणी



कोल्हापूर (हुपरी) ०१ सिटी न्यूज नेटवर्क 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा, अशी एकमुखी मागणी हुपरी येथे आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेत करण्यात आली. हुतात्मा स्मारक येथे पार पडलेल्या या सभेला आयोजकांच्या माहितीनुसार सुमारे ११ हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

सभेत टी. राजा सिंह यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य हिंदू समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या घटनांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र पोलीस टास्क फोर्स स्थापन करण्याची, तसेच महिलांसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासोबतच लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबतही सरकारने ठोस भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.

सभेत सनातन संस्था यांच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी हिंदू समाजाने संघटित राहण्याचे आवाहन केले. त्यांनी विविध राज्यांतील घटनांचा संदर्भ देत, जात-पात-पक्षभेद विसरून हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.

तसेच हिंदू जनजागृती समिती चे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रत्येक गावात ‘ग्रामसुरक्षा दले’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. हुपरी सूर्यतलाव येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाने समयमर्यादा जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली. ‘गांजा व ड्रग्ज’ विक्रीविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विविध मागण्या मांडल्या

सभेत पुढील मुद्द्यांवर मागण्या करण्यात आल्या :

  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करणे

  • लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करणे

  • अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाई

  • छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीसाठी निर्णय

  • ‘वंदे मातरम्’ला विरोध करणार्‍यांवर कारवाई

सभेची सुरुवात शंखनाद व दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन चैतन्य तागडे यांनी केले. सभेच्या शेवटी सामूहिक ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

ग्रंथप्रकाशन व सत्कार

यावेळी ‘घरच्या घरी करता येतील असे होमिओपॅथी उपचार’ तसेच ‘दत्त’ या ग्रंथाच्या मराठी व हिंदी ऑनलाइन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हिंदुत्वाच्या कार्यासाठी विशेष योगदान देणार्‍या काही कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला.

तसेच ९ मार्च रोजी हुपरी येथील सुभाष चौक येथे अमली पदार्थांविरोधात आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा सभेत करण्यात आली.

Comments