शहीद विरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

 शहीद विरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा




 लेखक-नाटककार हिमांशु स्मार्त यांची प्रेरणादायी उपस्थिती


कोल्हापूर (टिटवे )२७ सिटी न्यूज नेटवर्क 

शहीद विरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, टिटवे येथे मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक व नाटककार हिमांशु स्मार्त उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत पालकर होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे, ई सिटी न्यूज नेटवर्क चे संपादक सागर ठाणेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी महाविद्यालयातील प्रा. दिग्विजय कुंभार यांचीही उपस्थिती होती.


 “मराठी ही केवळ भाषा नाही, ती संस्कृती आहे” – हिमांशु स्मार्त


प्रमुख पाहुणे हिमांशु स्मार्त यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेची परंपरा, साहित्यिक वैभव आणि नव्या पिढीची जबाबदारी यावर भाष्य केले. “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. विद्यार्थ्यांनी मराठी वाचनाची सवय लावून भाषेचे जतन केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.


पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी माध्यमांच्या माध्यमातून मराठीला अधिक बळ देण्याची गरज व्यक्त केली. संपादक सागर ठाणेकर यांनी डिजिटल युगात मराठी पत्रकारितेच्या संधी आणि आव्हानांवर मार्गदर्शन केले.


 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी काव्यवाचन, भाषण आणि मराठी साहित्यावरील सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर यांनी उत्कृष्टपणे केले.


प्राचार्य प्रशांत पालकर यांनी आभार प्रदर्शन करताना, “महाविद्यालयात मराठी साहित्यिक उपक्रम सातत्याने राबवले जातील,” अशी ग्वाही दिली.


मराठी भाषा दिनानिमित्त टिटवे परिसरात भाषिक अभिमानाचा जागर अनुभवायला मिळाला.

Comments