ग्रामीण भागातील ‘शहीद पॅटर्न’ शिक्षण कौतुकास्पद – राज देशमुख; शहीदमध्ये ‘निसर्गदूत’ पुरस्कार व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


ग्रामीण भागातील ‘शहीद पॅटर्न’ शिक्षण कौतुकास्पद – राज देशमुख; शहीदमध्ये ‘निसर्गदूत’ पुरस्कार व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात



कोल्हापूर (तिटवे) ०८ सिटी न्यूज नेटवर्क 


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे आणि संस्कारयुक्त शिक्षण देणारे ‘शहीद पॅटर्न’ अत्यंत कौतुकास्पद आहे, असे मत चांगुलपणाच्या चळवळीचे अध्यक्ष राज देशमुख यांनी व्यक्त केले. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ‘निसर्गदूत पुरस्कार वितरण सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन’ कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.

राज देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील शिक्षण अधिक संस्कारी आणि जीवनमूल्ये देणारे असते. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना डॉ. जगन्नाथ पाटील यांसारख्या अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणे ही मोठी संधी आहे. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक व सामाजिक कार्य अत्यंत उल्लेखनीय असून संस्थेला माझ्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्यासाठी मी सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे मुख्य मार्गदर्शक व जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमांचा गौरव केला. ते म्हणाले, संस्थेतील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळवून, कला व क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय यश मिळवून तसेच सामाजिक कार्य व पर्यावरण संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे खेडोपाड्यातील वाड्या-वस्त्यांमधील मुलींनीही या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.

संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक झाडांची लागवड व संवर्धन केले असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक करण्यासाठी ‘निसर्गदूत’ पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘Mission Angel for Earth and Environment (MAEE – माई)’ या संकल्पनेअंतर्गत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘निसर्गदूत पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुरस्काराने पत्रकार संदीप आडनाईक, बांबू रिसर्च फाउंडेशनचे पाटलोबा पाटील, आपत्कालीन जीवरक्षक व माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिनकर कांबळे, जंगल अभ्यासक दत्ता मोरसे, वृक्षमित्र वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अमोल बुढढे, वन्यजीव अभ्यासक विजय पाटील, निसर्गमित्र अनिल चौगुले, राणीता चौगुले तसेच जीवरक्षक व निसर्ग संवर्धक बबिता जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

सन्मानित ‘निसर्गदूत’ मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

या कार्यक्रमात युवा महोत्सव, विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनी आणि गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. वैष्णवी डवरी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. शुभांगी भारमल, प्रा. प्रतिज्ञा कांबळे आणि प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले, तर आभार प्रा. सुनील पाटील यांनी मानले.

या सोहळ्यास प्राचार्या सिद्धता गौड, प्राचार्य हिमांशू चव्हाण, प्राचार्य सरिता धनवडे, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार तसेच शैक्षणिक, माध्यम व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments