जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे शहीद दिन उत्साहात साजरा

 जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे शहीद दिन उत्साहात साजरा




कोल्हापूर, दि. 23 सिटी न्यूज नेटवर्क 

 जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आज सकाळी 11.00 वाजता शहीद दिन अत्यंत आदरपूर्वक व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. तानाजी पाटील यांच्या हस्ते प्रमुख पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या धैर्य, त्याग व देशभक्तीची गाथा उपस्थितांसमोर उलगडून सांगितली. त्यांनी सांगितले की, या महान क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान सदैव प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मा. संतोष जोशी (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी), मा. अनिरुद्ध पिंपळे (जिल्हा आरोग्य अधिकारी), मा. अर्जुन गोळे (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा), मा. नितिन मस्के (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण), मा. अविनाश मेश्राम (सहाय्यक गट विकास अधिकारी), मा. मिना शेंडकर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक), मा. अरुणा हसबें (उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी), मा. अनिकेत गावडे (लेखाधिकारी) यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी शहीदांना विनम्र अभिवादन केले. यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा पाटील, अध्यापिका, मेन राजाराम हायस्कूल यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सुस्पष्टपणे मांडत शहीदांच्या कार्याची माहिती उपस्थितांपर्यंत पोहोचवली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देत देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित सर्वांनी शहीदांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Comments