६३ वा वर्धापनदिन उत्साहात; १२ फ्लेव्हरच्या ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ, दूध उत्पादकांसाठी नवीन योजना

६३ वा वर्धापनदिन उत्साहात; १२ फ्लेव्हरच्या ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ, दूध उत्पादकांसाठी नवीन योजना



कोल्हापूर, ता.१५ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या वतीने ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ, ‘गोकुळश्री’ स्पर्धा आणि विविध बक्षीस वितरण समारंभ गोकुळ प्रकल्प, शिरगाव येथे पार पडला. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघ गेल्या पाच वर्षांत सातत्याने प्रगती करत असून संघाच्या ठेवी ३२० कोटी रुपयांवरून वाढून सध्या ६०४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच दूध उत्पादकांना म्हैस दूध खरेदी दरात १४ रुपये आणि गाय दूध खरेदी दरात १० रुपयांची वाढ देण्यात आली आहे. सध्या संघाचे दूध संकलन सुमारे २० लाख लिटर असून ते २५ लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

उन्हाळ्यात पाणी व वैरणीची टंचाई लक्षात घेऊन गोकुळमार्फत वैरण बँक उभारण्याची योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गोकुळने जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना सुरू केली असून तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास प्रति जनावर दररोज ५०० रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आमदार सतेज पाटील म्हणाले की, गोकुळ हा केवळ दूध संकलनापुरता मर्यादित न राहता दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीद्वारे विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. गोकुळची गुणवत्ता आणि विश्वास ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून सुमारे पाच लाख दूध उत्पादकांना गोकुळमार्फत न्याय मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांनी १६ मार्च १९६३ रोजी सहकाराच्या माध्यमातून लावलेले छोटेसे रोप आज मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. गोकुळमार्फत १२ विविध फ्लेव्हरमध्ये ‘गोकुळ आईस्क्रीम’ बाजारात आणण्यात आले असून ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात ‘गोकुळश्री’ स्पर्धा व विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, महिला दूध उत्पादक संस्था तसेच कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे सर्वाधिक विक्री करणाऱ्या वितरकांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धांसाठी सुमारे १३ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

याशिवाय महिला दूध उत्पादकांच्या सन्मानासाठी ‘नारी सन्मान योजना’ सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी AI आधारित आधुनिक गोठा प्रणाली सुरू करण्याची योजना असल्याचेही सांगण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तसेच केक कापून गोकुळचा ६३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, प्रास्ताविक अरुण डोंगळे यांनी केले तर आभार शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ, केडीसीसी बँकेचे पदाधिकारी, दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी, वितरक तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments