व्यवसायिकांना दिलासा : महापालिका बजेटमध्ये दरवाढ नाही
महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक दरवाढ होणार नाही नगरसेवक शारंगधर देशमुख व ऋतुराज क्षीरसागर यांची कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही
कोल्हापूर, दि. १३ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२६–२७ चे अंदाजपत्रक लवकरच सादर होणार असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्यावसायिक दरवाढ करण्यात येणार नाही, अशी ग्वाही नगरसेवक शारंगधर देशमुख व ऋतुराज क्षीरसागर यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाला दिली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करू नये, अशी मागणी चेंबरच्या शिष्टमंडळाने आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ही बैठक नगरसेवक शारंगधर देशमुख व ऋतुराज क्षीरसागर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.
यावेळी चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी यांनी सांगितले की, महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या भाडेप्रश्नावर २०१५ पासून वाद सुरू आहे. २०१९ पासूनचे भाडे निश्चित करण्यात आले असले तरी अनेक गाळेधारक कोरोनानंतरच्या आर्थिक अडचणीमुळे भाडे भरू शकले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून काही गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.
गाळेधारकांना दिल्या जाणाऱ्या नोटिसांमध्ये भाडे, दंड, व्याज आणि जीएसटीचा समावेश असल्याने मोठा आर्थिक भार येत आहे. एखादा गाळेधारक १ लाख रुपये भरण्यास गेल्यास त्यातील सुमारे ६० हजार रुपये दंड व व्याजामध्ये जात असल्याचे कोठारी यांनी सांगितले. त्यामुळे मूळ भाडे, दंड आणि व्याज यांचे स्वतंत्र तपशील देऊन नोटिसा देण्याची मागणी त्यांनी केली.
यावर नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी गाळेधारकांसाठी पुन्हा अभय योजना आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कायद्याने दुसऱ्यांदा अभय योजना देता येते का, याबाबत माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी अमर क्षीरसागर यांनी २०१५ ते २०१७ या कालावधीतील थकीत गाळ्यांवर जीएसटी लागू नसतानाही नोटिसा दिल्याचा मुद्दा उपस्थित केला व त्या दुरुस्त करण्याची मागणी केली.
खुले व विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नावर बोलताना किशोर काटवे यांनी रेडीरेकनरच्या दोन टक्के वाढीप्रमाणे भाडे भरण्यास व्यापारी तयार असल्याचे सांगितले. तसेच सील केलेले गाळे पुन्हा सुरू करून देण्याची मागणी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर व शारंगधर देशमुख यांनी आयुक्तांकडे केली.
व्यवसाय परवाना आणि अग्निशमन कर एकत्र केल्यामुळे अनेक व्यवसायांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. परवाना नूतनीकरणाची मुदत सध्या एक महिना असून ती सहा महिने करण्याची मागणीही चेंबरकडून करण्यात आली.
सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे व्यापार-उद्योगावर मोठा परिणाम होत असून गॅसटंचाई, महागाई आणि पेट्रोलियम पदार्थांच्या संभाव्य दरवाढीचा परिणाम व्यवसायांवर होण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक दरवाढ करू नये, अशी मागणी चेंबरने केली.
बैठकीला चेंबरचे संचालक संपत पाटील, राहुल नष्टे, अविनाश नासिपुडे, संदीप वीर तसेच अनेक गाळेधारक व व्यापारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment