‘गोकुळ’मध्ये आंतरराष्ट्रीय ज्ञानाची भरारी! नेदरलॅन्ड्स तज्ज्ञांकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण

 ‘गोकुळ’मध्ये आंतरराष्ट्रीय ज्ञानाची भरारी! नेदरलॅन्ड्स तज्ज्ञांकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण

डॉ. एर्विन द. विथ यांच्या सत्कारप्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अजित नरके, प्रकाश पाटील, डॉ. योगेश गोडबोले, डॉ. प्रकाश साळुंखे आदी उपस्थित.


कोल्हापूर, ता. १७ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दुग्धव्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नेदरलॅन्ड्समधील पी.यू.एम. (प्रोजेक्ट आउटसेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने गोकुळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले दहा दिवसांचे अत्याधुनिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

या प्रशिक्षणासाठी नेदरलॅन्ड्सचे अनुभवी तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर ताराबाई पार्क येथील विकास कक्षात गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

गोकुळ संघाने पी.यू.एम. संस्थेसोबत १८ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२७ या कालावधीसाठी सहकार्य करार केला असून, या अंतर्गत दर दोन महिन्यांनी विविध विषयांतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ गोकुळमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पशुपालन व पशुवैद्यकीय क्षेत्रात जागतिक दर्जाचे ज्ञान मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात “जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन” या विषयावर ६ ते १७ मार्च २०२६ दरम्यान प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात ४३ पशुवैद्यकीय अधिकारी सहभागी झाले. प्रत्यक्ष गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे आणि गटचर्चा यांद्वारे अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणात जनावरांची उत्पादकता वाढ, आरोग्य निरीक्षण, वांझपणावर उपाय, वासरांचे संगोपन, उष्णतेतील ताण व्यवस्थापन तसेच गोठा व्यवस्थापन सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून त्यांना प्रभावी मार्गदर्शन कसे करावे, याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.

याबाबत बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “गोकुळ संघाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. पशुपालन क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. पी.यू.एम. संस्थेने गोकुळची निवड केली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून गोकुळच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतल्याचे हे प्रतीक आहे.”

या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान अद्ययावत होणार असून त्याचा थेट लाभ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. उत्पादनवाढ, जनावरांचे आरोग्य सुधारणा आणि गोठा व्यवस्थापनातील कार्यक्षमता वाढ यामुळे दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व फायदेशीर होण्यास मदत होणार आहे.

पुढील दोन वर्षांत पशुधन व्यवस्थापन, प्रजनन क्षमता, खाद्य व चारा व्यवस्थापन तसेच विपणन आणि धोरणात्मक नियोजन या विषयांवरही तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे.


Comments