मुंबईत “एक महाराष्ट्र – एक महाराष्ट्र केसरी”साठी
पैलवानाचे साकडंआंदोलन
मुंबई १३ सिटी न्यूज नेटवर्क
राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकाच अधिकृत संघटनेमार्फत आयोजित व्हावी, या मागणीसाठी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान येथे पैलवानांनी “एक महाराष्ट्र – एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा” या मागणीसाठी साकडं आंदोलन केले. डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक दिग्गज पैलवान, वस्ताद आणि कुस्ती प्रशिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा झाल्यानंतरही महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेला नवे बळ मिळाले. 1952 मध्ये खाशाबा जाधव यांनी 1952 Summer Olympics मध्ये भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकत देशातील कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा दिली.
यानंतर 2 ऑक्टोबर 1953 रोजी कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ची स्थापना केली. 1961 पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेतेपदाची परंपरा सुरू झाली. आतापर्यंत 68 वर्षांच्या इतिहासात दोन ट्रिपल महाराष्ट्र केसरी, सहा डबल महाराष्ट्र केसरी तर अनेक पैलवानांनी एकदाच हा मान मिळवला आहे.
1987 पर्यंत महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती मातीवर होत होती. सोलापूरचे पैलवान तानाजी बनकर हे मातीवर महाराष्ट्र केसरी होणारे शेवटचे विजेते ठरले. 1988 मध्ये नगर येथे झालेल्या 33 व्या अधिवेशनापासून मॅटवर स्पर्धा सुरू झाली आणि सोलापूरचे छोटा रावसाहेब मगर हे मॅटवरील पहिले महाराष्ट्र केसरी ठरले.
2020 मध्ये सातारा येथे झालेल्या 64 व्या अधिवेशनात कोल्हापूरचे पृथ्वीराज पाटील यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे स्पर्धा रद्द झाल्या. 2023 मध्ये कुस्तीगीर परिषदेवर आरोप झाल्यानंतर भारतीय कुस्ती संघाने अस्थायी समिती नेमून पुण्यातील कोथरूड येथे स्पर्धा घेतली.
सध्या 18 ते 22 मार्च दरम्यान पुण्यातील वाघोली येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. मात्र वेगवेगळ्या संघटनांकडून स्वतंत्र स्पर्धा घेण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने कुस्ती क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत खासबाग केसरी कुस्ती मैदानाचे अध्यक्ष संग्राम कांबळे यांनी सांगितले की, “आम्ही कोणत्याही संघटनेच्या विरोधात नाही. मात्र सर्व संघटनांनी आपापसातील मतभेद मिटवून कुस्तीच्या भल्यासाठी एकच अधिकृत कुस्ती संघटना निर्माण करावी. महाराष्ट्र शासनाने यासाठी पुढाकार घेऊन बैठक बोलवावी आणि दरवर्षी अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी.”
या साकडं आंदोलनाला हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच राज्यभरातील अनेक नामांकित पैलवान, वस्ताद आणि कुस्ती प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment