गुढीपाडवा व रमजान ईद निमित्त ‘गोकुळ’ दुधाची विक्रमी विक्री
एका दिवसात २५.४५ लाख लिटर विक्रीचा नवा उच्चांक
कोल्हापूर, ता. २१ सिटी न्यूज नेटवर्क
रमजान ईद आणि गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने दुधाच्या विक्रीत नवा विक्रम नोंदवला आहे. सणासुदीच्या काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन केलेल्या प्रभावी नियोजनामुळे रमजान ईद दिवशी तब्बल २५ लाख ४५ हजार ०४७ लिटर दुधाची विक्री झाली असून हा ‘गोकुळ’च्या इतिहासातील एका दिवसातील सर्वोच्च विक्रम ठरला आहे.
याचबरोबर, गुढीपाडवा (दि. १९ मार्च २०२६) दिवशीही सुमारे १८ लाख लिटर दुधाची विक्री झाली. तसेच श्रीखंड व बासुंदी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
गेल्या वर्षी रमजान ईद दिवशी २३ लाख ६३ हजार १७० लिटर दुधाची विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ८१ हजार ८७७ लिटरने वाढ झाल्याने ‘गोकुळ’च्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावल्याचे दिसून येते.
या यशाबद्दल संघाच्या वतीने महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि ‘गोकुळ’चे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, “गोकुळ हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असून सणासुदीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरळीत दूधपुरवठा करणे ही उल्लेखनीय कामगिरी आहे. शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच हे यश शक्य झाले आहे.”
तर चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, “दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सातत्यपूर्ण व दर्जेदार पुरवठा, तसेच अधिकारी, कर्मचारी व वितरकांचे अचूक नियोजन यामुळेच विक्रमी विक्री साध्य झाली. शेतकऱ्यांना योग्य दर देत ग्राहकांपर्यंत दर्जेदार दूध पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”
यावेळी ‘गोकुळ’ परिवारातील सर्व घटक—दूध उत्पादक शेतकरी, वितरक, कर्मचारी, अधिकारी आणि हितचिंतक—यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.
तसेच भविष्यात दररोज २७ लाख लिटर दूध विक्रीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा विश्वासही चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Comments
Post a Comment