एआय युग हे केवळ अपग्रेड नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा रीसेट : जियो
मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मैथ्यू ओमेन यांची ‘इंटेलिजन्स ग्रिड’ संकल्पना मांडणी
बार्सिलोना, ४ सिटी न्यूज नेटवर्क
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा काळ दूरसंचार क्षेत्रासाठी फक्त तांत्रिक सुधारणांचा टप्पा नसून, तो संपूर्ण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय मॉडेल्सचा पूर्णतः रीसेट आहे, असे मत Mathew Oommen, ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी, Jio Platforms Limited यांनी व्यक्त केले. Mobile World Congress, Barcelona येथे बोलताना त्यांनी सांगितले की, जग आता “मिनिट्स आणि बाइट्स”च्या अर्थव्यवस्थेतून पुढे जात “टोकन्स आणि इंटेलिजन्स”च्या नव्या युगात प्रवेश करत आहे.
ओमेन यांच्या मते, औद्योगिक युग उत्पादनाधारित होते, इंटरनेट युगाने कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड दिले; मात्र एआय युग आर्थिक समीकरणे पूर्णतः बदलून टाकणार आहे. “हा केवळ अपग्रेड सायकल नाही, तर हा संपूर्ण रीसेट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक स्तरावर एआयमध्ये होत असलेली ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक या बदलाची तीव्रता दर्शवते.
कंपनीच्या दृष्टीकोनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “हा बदल दूरसंचार उद्योगासाठी सर्वात मोठी संधी आहे. जियो स्वतःकडे केवळ नेटवर्क पुरवठादार म्हणून पाहत नाही, तर ‘इंटेलिजन्स ग्रिड’ उभारणारा म्हणून पाहतो. टेलिकॉमची करन्सी मिनिट्सपासून बाइट्सकडे आणि आता टोकन्सकडे वळत आहे. आम्हाला केवळ सर्वात मोठी टोकन पाइपलाईन उभारायची नाही, तर सर्वात मोठे टोकन जनरेटर बनायचे आहे.”
मिनिट्स, बाइट्स आणि टोकन्सद्वारे टेलिकॉम उद्योगाचा प्रवास समजावून सांगताना त्यांनी नमूद केले की, सुरुवातीला उत्पन्नाचा आधार व्हॉइस कॉलिंग होता, ज्याची गणना मिनिट्समध्ये होत असे. त्यानंतर डेटा युग आले आणि वापर बाइट्समध्ये मोजला जाऊ लागला. भविष्यात हीच संकल्पना एआय टोकन्समध्ये रूपांतरित होईल. यात एआय कम्प्युटेशन, मॉडेल इन्फरन्स (एआयकडून प्रतिसाद), स्वयंचलित निर्णयप्रक्रिया आणि मशीन-टू-मशीन संवाद अशा बुद्धिमान सेवांचा समावेश असेल.
ओमेन यांनी आठवण करून दिली की, जियोने भारतात व्हॉइस सेवा मोफत केल्या आणि डेटा दर जीबीमागे ९ सेंटपर्यंत खाली आणला, ज्यामुळे ५२.५ कोटींहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचली. आता पुढील उद्दिष्ट म्हणजे “सर्वात कमी खर्चात टोकन-प्रति-वॅट” उपलब्ध करून देणे—म्हणजेच परवडणाऱ्या दरात मोठ्या प्रमाणावर इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे.
‘एआय कमांड आर्किटेक्चरल फ्रेमवर्क’चा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, भविष्यातील नेटवर्क हे वेगवेगळ्या साधनांचा केवळ मेळ नसेल, तर एकसंध आणि एकात्मिक आर्किटेक्चर असेल. एआय आणि दूरसंचार पायाभूत सुविधा एकत्र येऊन अशी प्रणाली तयार करतील, जी रिअल टाइममध्ये विचार करेल, समन्वय साधेल आणि निर्णय घेईल.
त्यांच्या मते, तंत्रज्ञानातील नेतृत्व म्हणजेच आर्थिक नेतृत्व, आणि त्यावरूनच पुढील राष्ट्रीय नेतृत्व निश्चित होईल. ऊर्जा, वाहतूक, वित्त आणि सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये इंटेलिजन्स समाविष्ट करणे आवश्यक ठरणार असून, त्याचा पाया दूरसंचार पायाभूत सुविधांवरच उभा राहील.
एआय परिवर्तनामुळे काही प्रमाणात चिंता निर्माण होऊ शकते, हे मान्य करत ओमेन यांनी याला “आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी” असे संबोधले. या बदलाला स्वीकारणारे ऑपरेटर्सच भविष्यातील अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
.jpeg)
Comments
Post a Comment