सहकार क्षेत्रातील महिलांचा गौरव सोहळा; ३ एप्रिलला कोल्हापुरात ‘सहकार सम्राज्ञी’ पुरस्कार आणि कार्यशाळा
सहकार क्षेत्रातील महिलांचा गौरव सोहळा; ३ एप्रिलला कोल्हापुरात ‘सहकार सम्राज्ञी’ पुरस्कार आणि कार्यशाळा
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा विशेष कार्यक्रम होत असून, दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापुरातील आनंद भवन, सायबर कॉलेज सभागृह येथे ‘सहकार सम्राज्ञी’ पुरस्कार सोहळा आणि एकदिवसीय कार्यशाळा पार पडणार आहे.
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या यशस्वी महिलांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीत सहकार चळवळीचे मोठे योगदान असून, या चळवळीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात बेस्ट चेअरमन, बेस्ट सीईओ, बेस्ट विशेष विक्री अधिकारी अशा विविध गटांत पुरस्कार दिले जाणार आहेत. ‘सहकार सम्राज्ञी’ किताबासाठी प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला २१,००० रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी १५,००० रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ११,००० रुपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, महिला सबलीकरणाच्या दृष्टीने सहकार कायद्यातील अपेक्षित बदल या विषयावर विशेष चर्चासत्र होणार आहे. तसेच व्यवसायासाठी निधी उभारणी, प्रभावी मार्केटिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, गुणवत्ता राखून पॅकेजिंग व जाहिरात यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या सहकार इतिहासात महिलांसाठी अशा प्रकारचा पुरस्कार व प्रशिक्षण उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात येत असल्याचे फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी नावनोंदणी अनिवार्य असून इच्छुकांनी ७८८८२८१२५१ किंवा ९८२२२६९८१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केले आहे.

Comments
Post a Comment