तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या – खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

 तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या – खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी



नवी दिल्ली, दि. ११ सिटी न्यूज नेटवर्क 

सध्या नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असून कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी खासदार Dhananjay Mahadik यांनी संसदेत केली.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.

संसदेतील चर्चेदरम्यान खासदार महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या भरीव निधीबद्दल आभार मानले. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून कागल ते सातारा सहा लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी २,१६२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच कोल्हापूर ते रत्नागिरी चार लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी ५,१९२ कोटी रुपये आणि कोल्हापूर ते सांगली चौपदरी रस्त्यासाठी १,१९२ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शिरोलीजवळील सांगली फाट्यापासून उंचगावपर्यंत पिलरवरील सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात येणार आहे. या उड्डाण पुलासोबतच कोल्हापूर शहरात प्रवेशासाठी बास्केट ब्रिज उभारला जाणार असून तो पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मात्र तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याचे काम वेगाने सुरू व्हावे, तसेच हा उड्डाण पुल पन्हाळा रोडवरील कोतोलीपर्यंत वाढवावा आणि शहरातील दुसरी बाजू फुलेवाडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.

यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की, कोल्हापूर महापालिकेने युटिलिटी शिफ्टिंग आणि जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्यास केंद्र सरकारकडून या उड्डाण पुलाच्या कामासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल.

गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते विकासासाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला असून अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. शिरोली ते उचगाव उड्डाण पुलासाठी सुमारे ९१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कागल शहराजवळील ३५८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

 कोल्हापूरचे गडकरींकडून कौतुक


संसदेत बोलताना केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी कोल्हापूरचे विशेष कौतुक केले. सहकार, कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात कोल्हापूर आघाडीवर असून दरडोई उत्पन्नातही कोल्हापूर देशात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खासदार Dhananjay Mahadik यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे बास्केट ब्रिजच्या सर्वोत्तम डिझाईनला रस्ते विकास महामंडळाने मान्यता दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

.

Comments