‘गोकुळ’कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’; २ लाखांपर्यंत विमा संरक्षण
जागतिक महिला दिनाचे औचित्य; सुमारे १ लाख महिला दूध उत्पादकांना लाभ
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
गोकुळ दूध संघ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) कडून दूध उत्पादक महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिला दूध उत्पादकांना २ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) निमित्त गोकुळच्या शिरगाव येथील कार्यक्रमात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे अनावरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ही योजना गोकुळ दूध संघ आणि दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
१ लाख महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट
२०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष’ म्हणून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कष्टकरी दूध उत्पादक महिलांना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रारंभी गोकुळशी संलग्न असलेल्या सुमारे १ लाख महिला दूध उत्पादकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
प्रीमियम फक्त १५० रुपये
या योजनेसाठी वार्षिक १५० रुपये प्रीमियम निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ३० टक्के म्हणजे ४५ रुपये गोकुळ दूध संघाकडून अनुदान स्वरूपात भरले जाणार असून उर्वरित १०५ रुपये लाभार्थी महिलांकडून भरावे लागतील. कमी प्रीमियममध्ये अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न गोकुळने केला असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
कोणाला मिळणार लाभ?
वय १८ ते ७० वर्षे असलेल्या गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांमधील महिला दूध उत्पादकांना योजना लागू
विम्याचा कालावधी एक वर्ष
या घटनांमध्ये मिळणार विमा संरक्षण
या योजनेअंतर्गत खालील बाबींमध्ये विमा संरक्षण मिळणार आहे –
अपघाती मृत्यू
कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व
लाभार्थीच्या आई-वडील किंवा पतीचा अपघाती मृत्यू
अॅसिड हल्ला
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
या माध्यमातून अचानक उद्भवणाऱ्या संकटाच्या काळात महिला दूध उत्पादकांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
दुग्ध व्यवसायातील महिलांना आधार
ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग आहे. अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवू नये यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यामुळे दुग्ध व्यवसायातील महिलांचा सहभाग अधिक बळकट होईल, असा विश्वास चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
या योजनेबाबतची सविस्तर माहिती गोकुळ दूध संघाकडून प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार असून जास्तीत जास्त महिला दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कार्यक्रमास उपस्थित
यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अजित नरके, प्रकाश पाटील, न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीच्या मॅनेजर रिता सिन्हा, कॉ. बबली रावत, कॉ. स्मिता केरिमाने, श्रीमती पद्मजा आपटे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी तसेच गोकुळचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment