करवीरनगरीत गॅस टंचाईचा फटका; अन्नछत्र सेवा धोक्यात – अखंडित पुरवठ्याची सकल हिंदू समाजतर्फे मागणी
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरनगरीत सध्या निर्माण झालेल्या कमर्शियल गॅस टंचाईमुळे हॉटेल व सामाजिक सेवाभावी संस्थांवर मोठा परिणाम होत आहे. आई अंबाबाईच्या पावन वास्तव्याने पूज्य ठरलेल्या या नगरीत दररोज लाखो पर्यटक, भाविक भक्त भेट देत असतात.
दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडी येथील श्री दत्त देवस्थान, ऐतिहासिक पन्हाळा यांसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे कोल्हापूरचे महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र, सध्याच्या गॅस टंचाईमुळे अन्नछत्र सेवा व हॉटेल व्यवसाय अडचणीत आले आहेत.
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, श्री अंबाबाई भक्त मंडळ, कोल्हापुरी थाळी, उत्तरेश्वर थाळी तसेच शहरातील शिवभोजन केंद्रे दररोज हजारो गरजू, भाविक व रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत किंवा अत्यल्प दरात अन्नदान करतात. या सेवेला गॅस टंचाईचा मोठा फटका बसत आहे.
शासनाने आश्रमशाळा व रुग्णालयांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून अखंडित गॅस पुरवठ्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापुरातील अन्नछत्र व सामाजिक संस्थांनाही विशेष बाब म्हणून अखंडित गॅस पुरवठ्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सकल हिंदू समाज, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. आगामी उन्हाळी सुट्टीत वाढणाऱ्या पर्यटक व भाविकांच्या सेवेसाठी गॅस पुरवठा सुरळीत ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक किशोर घाटगे, मनोहर सोरप, महादेव पाटील, श्रीकांत मंडलिक, सम्राट शिर्के, विशाल शिराळकर, अशोक गुरव, शिवानंद स्वामी, संजय भोसले, तन्मय मेवेकरी, योगेश केरकर, फिरोजखान आस्वाद आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment