‘गोकुळ’मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना
कोल्हापूर, ता. ८ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिरगाव येथील गोकुळ मल्टीपर्पज हॉलमध्ये महिला मेळावा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळ, आयटक नॅशनल कौन्सिल सदस्या कॉ. बबली रावत, प्रा. स्मिता केरिमाने व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे मोठे योगदान असते. त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघाच्या प्रगतीमध्येही महिला दूध उत्पादकांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला दुग्ध व्यवसायात सक्रियपणे काम करत असून त्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांनी मनापासून प्रयत्न केले तर दुग्ध व्यवसाय अधिक यशस्वी होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात.
ते पुढे म्हणाले की, गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेली ‘नारी सन्मान विमा योजना’ ही महिला दूध उत्पादकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर “मी कोण?” या विषयावर कॉ. बबली रावत यांनी व्यक्तिमत्वाची जाणीव, आत्मभान आणि समाजातील आपली भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात “सोहळा आनंदी आयुष्याचा” या विषयावर प्रा. स्मिता केरिमाने यांनी सकारात्मक विचार आणि आनंदी जीवनशैलीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी शाहीर सदाशिव निकम व सहकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले. गोकुळ दूध संघाचे कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांच्या सौभाग्यवती व कन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत मृण्मयी सातवेकर, प्रास्ताविक संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी केले तर संपदा थोरात यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संघातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाला संघाचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment