संभाजीनगर बसस्थानकाच्या नामफलकावर ‘कोल्हापूर’चा उल्लेख करावा; ‘शहरभान’ची मागणी

 संभाजीनगर बसस्थानकाच्या नामफलकावर ‘कोल्हापूर’चा उल्लेख करावा; ‘शहरभान’ची मागणी




कोल्हापूर, दि. ४ सिटी न्यूज नेटवर्क 

 येथील नव्याने उभारण्यात आलेल्या संभाजीनगर एस.टी. बसस्थानकाच्या मुख्य नामफलकावर ‘कोल्हापूर’ या शहराच्या नावाचा समावेश करावा, अशी मागणी ‘शहरभान’ संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संभाजीनगर आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले.



सध्या बसस्थानकाच्या मुख्य फलकावर मोठ्या अक्षरांत केवळ ‘संभाजी नगर बसस्थानक’ एवढाच उल्लेख आहे. बाहेरगावाहून येणारे प्रवासी जेव्हा एस.टी. बसस्थानकावर पोहोचतात, तेव्हा त्या फलकावरून ते कोणत्या शहरात आले आहेत याची स्पष्ट माहिती मिळते. मात्र येथे ‘कोल्हापूर’ नावाचा उल्लेख नसल्याने प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘संभाजीनगर’ नावाचे स्वतंत्र शहर (Chhatrapati Sambhajinagar) अस्तित्वात असल्याने, कोल्हापूरमधील या बसस्थानकाची ओळख स्पष्ट व्हावी यासाठी फलकावर ठळकपणे ‘कोल्हापूर’ असे लिहिणे आवश्यक असल्याचे ‘शहरभान’ने नमूद केले आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच शहराची स्पष्ट ओळख निर्माण करण्यासाठी मुख्य फलकासमोर किंवा खाली ‘कोल्हापूर’ असा ठळक उल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments