"त्या" भव्य मोर्चानंतर जोतिबा यात्रेवर तणावाचे सावट; प्रशासनासमोर मोठे आव्हान
कोल्हापूर, ता. ३१ सिटी न्यूज नेटवर्क
वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ ३० मार्च रोजी परिते ग्रामस्थांनी काढलेल्या आक्रमक मोर्चानंतर आगामी जोतिबा यात्रेवर तणावाचे सावट निर्माण झाले आहे.
यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना झालेल्या या मोर्चामुळे वातावरण चिघळल्याचे दिसत आहे. “पुजारी हटाव, जोतिबा मंदिर बचाव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेमुळे यात्रेदरम्यान वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी लाखो भाविक जोतिबा यात्रेसाठी येथे येतात. मात्र, यंदा मोर्चानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि मंदिर परिसरातील शिस्त राखणे ही मोठी जबाबदारी प्रशासनासमोर उभी राहिली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी ही कारवाई यात्रेपूर्वी होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामस्थांनी पुजाऱ्यांवर गंभीर आरोप करत शासकीय पुजारी नेमण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात पुजारी आणि ग्रामस्थ यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परिस्थिती लक्षात घेता, यात्रेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त, मध्यस्थी आणि नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. भाविकांमध्येही संभ्रमाचे वातावरण असून, यात्रा शांततेत पार पडावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
आता प्रशासन योग्य वेळी ठोस निर्णय घेते का, यावरच यंदाची जोतिबा यात्रा निर्विघ्न पार पडणार की तणावात, हे ठरणार आहे.


Comments
Post a Comment