६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गोकुळ आईस्क्रीम’चा भव्य शुभारंभ

 ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गोकुळ आईस्क्रीम’चा भव्य शुभारंभ



विविध पुरस्कार व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन

कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आपल्या यशस्वी वाटचालीची ६३ वर्षे पूर्ण करत असून या निमित्ताने दि. १५ मार्च २०२६ रोजी गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध फ्लेवर्समधील प्रीमियम दर्जाचे ‘गोकुळ आईस्क्रीम’ बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात सन २०२४–२५ या वर्षातील ‘गोकुळ श्री’ पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावर सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांचा, म्हशीचे सर्वाधिक व उत्कृष्ट दर्जाचे दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांचा तसेच गाय-म्हैस दूध पुरवठ्यात आघाडीवर असलेल्या महिला दूध संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थांची जास्तीत जास्त विक्री करणाऱ्या वितरकांचाही सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या दूध उत्पादक व वितरकांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे संघाकडून सांगण्यात आले.

सध्या गोकुळमार्फत टेट्रापॅक दूध, पनीर, चीज, गुलाबजाम, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेव्हर मिल्क, बासुंदी, पेढा आदी दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जात असून या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून वितरक व ग्राहकांकडून गोकुळ आईस्क्रीम बाजारात उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले हे आईस्क्रीम आता ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

गोकुळचे आईस्क्रीम कप पॅक, कोन पॅक आणि फॅमिली पॅक या प्रकारांमध्ये उपलब्ध असून मँगो, नॅचरल व्हॅनिला, बेल्जियन चॉकलेट, बटरस्कॉच, हॅझलनट क्रंच, बिस्कॉफ, अफगाण ड्रायफ्रूट आणि राजभोग अशा विविध फ्लेवर्समध्ये ते बाजारात येणार आहे.

गोकुळचे फुलक्रीम व गाय दूधाला मुंबई व पुणे येथे जसा चांगला प्रतिसाद मिळतो, त्याचप्रमाणे गोकुळच्या आईस्क्रीमलाही या बाजारपेठांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

गुढी पाडवा, रमजान ईद तसेच उन्हाळ्याच्या हंगामात ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबरच गोकुळच्या आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.

या कार्यक्रमाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, मान्यवर, चेअरमन नविद मुश्रीफ व गोकुळचे संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.


Comments