कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार – आमदार अमल महाडिक
शेंडा पार्क येथे आयटी पार्कसाठी ३४.३६ हेक्टर जमीन हस्तांतरणाचा शासन निर्णय
कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेंडा पार्क येथे आयटी पार्क उभारणीसाठी ३४.३६ हेक्टर जमीन महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (AIDC) कडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरातील तरुणाईच्या रोजगाराच्या संधींना नवे पंख मिळणार आहेत.
या निर्णयामागे आमदार अमल महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी आयटी पार्क उभारणीचा विषय प्राधान्याने हाती घेतला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वारंवार निवेदने सादर केली होती. कृषी विभागाकडील जागा उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी विशेष बैठका घेत आग्रह धरला होता.
सध्या कोल्हापुरातील अनेक आयटी अभियंत्यांना आवश्यक सुविधा आणि संधींच्या अभावामुळे Pune, Bengaluru आणि Hyderabad यांसारख्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत होते. या ‘ब्रेन ड्रेन’ला आळा घालण्यासाठी स्थानिक स्तरावर आयटी पार्क उभारणे अत्यावश्यक असल्याचे आमदार महाडिक यांनी अधोरेखित केले होते.
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ३४.३६ हेक्टर जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्याने शेंडा पार्क येथे आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापुरातील तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
कोल्हापूरकरांना दिलेल्या वचनाची पूर्तता होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Post a Comment