१४–१५ मार्चला २५० हून अधिक कंदमुळांचे भव्य प्रदर्शन
कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क
निसर्गात आढळणाऱ्या विविध कंदवर्गीय वनस्पतींची माहिती नागरिकांना मिळावी तसेच शेतकऱ्यांना त्यांची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने १४ व १५ मार्च २०२६ रोजी कोल्हापूरात कंदमुळांचे भव्य आणि माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात २५० हून अधिक कंदमुळांच्या जाती-प्रजाती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
हे प्रदर्शन कोल्हापूर शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे भरवण्यात येणार असून वेळ सकाळी १० ते सायंकाळी ७ अशी आहे. विशेष म्हणजे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळा
शनिवार, १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे तसेच सिद्धगिरी नर्सरीचे सतीश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
२५० पेक्षा अधिक कंदमुळे पाहण्याची संधी
या प्रदर्शनात शतावरी, अमरकंद, सफेद मुसळी, भुईकोहळा, कोष्ठकुलिंजन यांसारख्या औषधी वनस्पतींसह गाजर, मुळा, बीट, आले, हळद, कांदा, लसूण यांसारख्या दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या कंदांचा समावेश असेल. याशिवाय अळू, कमळकाकडी, सुरण, शेवळा तसेच विविध प्रकारचे अळू, काळी हळद, आंबेहळद, रानहळद, अमेरिकन अळू, चिनी बटाटे अशा सुमारे २५० हून अधिक कंदांच्या जाती-प्रजातींचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
वनस्पती तज्ज्ञ व निसर्गअंकुर संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनासाठी कंदमुळांचे संकलन महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा राज्यातील विविध भागांतून करण्यात आले आहे.
कंदमुळांपासून बनणारे पदार्थही चाखता येणार
प्रदर्शनात कंदमुळांपासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांच्या पाककृतींचे मार्गदर्शन केले जाणार असून काही पदार्थ चाखण्यासाठीही उपलब्ध असतील. तसेच काही कंदमुळे आणि रानभाज्या, वृक्ष व औषधी वनस्पतींवरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
“लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स” या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मिलिंद धोंड यांनी केले आहे.
हे प्रदर्शन निसर्गअंकुर, कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

Comments
Post a Comment