‘लाडकी बहीण’ मराठी चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित; कौटुंबिक मनोरंजनासोबत सामाजिक संदेश
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
समाजातील घडामोडींवर भाष्य करणारे विषय नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे केंद्र ठरतात. महाराष्ट्र सरकारच्या बहुचर्चित **‘लाडकी बहीण योजने’**च्या पार्श्वभूमीवर तयार झालेला ‘लाडकी बहीण’ हा मराठी चित्रपट आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. “१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी” अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, कौटुंबिक मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणारा चित्रपट म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन शितल शिंदे यांनी केले असून निर्मितीही त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. बाबासाहेब पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत, तर लेखक प्रताप गंगावणे चित्रपटाचे मार्गदर्शक आहेत. तसेच शेखर मते, पंकज चव्हाण, तृप्ती देसाई आणि लहू साळुंखे यांचे चित्रपटाला विशेष सहकार्य लाभले आहे.
चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे आणि मेगा शिंदे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशी मदत करू शकते, याचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. “एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ…” या उक्तीप्रमाणे गोरगरीब महिला एकत्र येऊन आपला विकास कसा साधतात, हा चित्रपटाचा महत्त्वाचा पैलू आहे. सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करतानाच विषयातील गांभीर्यही जपण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.
चित्रपटात सुमधूर गीत-संगीत, बहारदार नृत्य आणि उत्कंठावर्धक कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. विशेष म्हणजे लावणी क्वीन गौतमी पाटीलची गवळणही या चित्रपटाचे खास आकर्षण ठरणार आहे. चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी चिनू चेतन यांनी केली असून संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. बाबा लाड आणि चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. तसेच उमेश गवळी, आनंद शिंदे आणि गायत्री शेलार यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी सादर करण्यात आली आहेत.
आशयघन कथा, प्रभावी अभिनय आणि सामाजिक संदेश यामुळे ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव देईल, असा विश्वास दिग्दर्शिका शितल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Post a Comment