कोल्हापूर येथे ९ मार्चला ‘भव्य संघर्ष महामोर्चा’; SC आरक्षण बचावासाठी समितीची हाक

 

कोल्हापूर येथे ९ मार्चला ‘भव्य संघर्ष महामोर्चा’; SC आरक्षण बचावासाठी समितीची हाक





कोल्हापूर, दि. ३ सिटी न्यूज नेटवर्क 

अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या बचावासाठी आणि कथित खोट्या जात प्रमाणपत्रांवर कारवाईच्या मागणीसाठी ‘अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती, कोल्हापूर’च्या वतीने सोमवार, ९ मार्च रोजी शहरात भव्य संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांमध्ये काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे SC आरक्षित जागांवर विजय मिळवल्याचा आरोप समितीने केला आहे.

समितीच्या पत्रकार परिषदेत असा दावा करण्यात आला की, श्री. दरगोंडा बसगोंडा उर्फ महेश पाटील (पट्टणकोडोली जि.प. सदस्य), श्री. महेश महादेव तुरबतमठ (गडहिंग्लज नगराध्यक्ष) आणि सौ. अलका अशोक स्वामी (इचलकरंजी नगरसेविका) यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवल्या. या प्रकरणात संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्यांची पदे बरखास्त करावीत, तसेच कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

समितीच्या मते, अशा प्रकारांमुळे खऱ्या SC उमेदवारांचे राजकीय प्रतिनिधित्व हिरावले जात असून संविधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर होत आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक हक्कांवर थेट आघात असल्याची भावना समाजात तीव्र झाल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, कथितरीत्या अपूर्ण कागदपत्रांवर खोटे दाखले देण्यात अधिकाऱ्यांची संगनमताची भूमिका असल्याचा आरोप करत पुढील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व खातेनिहाय चौकशीची मागणी करण्यात आली आहे:

  • श्री. दीपक शिंदे (उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी)

  • श्री. महेश खिलारे (अप्पर तहसीलदार, इचलकरंजी)

  • श्री. सुशील बेलेकर (कार्यकारी दंडाधिकारी, हातकणंगले)

  • श्री. ऋषिकेश शेळके (कार्यकारी दंडाधिकारी, गडहिंग्लज)

  • श्री. एकनाथ काळबांडे (उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज)

जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक व पारदर्शक करण्याची मागणी करत, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे समितीने स्पष्ट केले आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

पत्रकार परिषदेत माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उत्तमदादा कांबळे, नगरसेवक दुर्वास कदम, प्रमोद कदम, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, बाबासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, डॉ. अनिल माने, प्रेमानंद मोरे, भाऊसो काळे, डॉ. शरद गायकवाड, विनोद कांबळे, दीपक खांडेकर, जि.प. सदस्य राहुल आवळे, श्रीधर मोरे आदी उपस्थित होते.

समितीने सर्व बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी, बुरुड आदी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Comments